भोकर : माणुसकीच्या नात्यावरच घाव घालणाऱ्याला समाजच काय कायदाही माफ करत नाही. हे २३ रोजी भोकर जिल्हा सत्र न्यायालयात हत्या व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. असे असले तरी घटनेचा बळी ठरलेल्या ‘त्या’ निष्पाप कोवळ्या जीवाचा काय दोष? अशा किती तरी चिमुकल्या विश्वासाच्या बळी ठरत आहेत, ही समाज व्यवस्थेची मानसिकता कधी सुधारणार? असे किती तरी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
शेतातल्या सालगड्याला परिवारातील सदस्याप्रमाणे प्रेम देणाऱ्या कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीने मामा म्हणून संबोधून माणुसकीचे नाते जपले होते. त्याच मामाच्या मनातील दैत्य अवतार जागा होऊन अमानुष कृत्य करीत नात्याला कलंक लावला. आई-वडिलांकडे हट्ट करून २० जानेवारी रोजी शेतावर आलेल्या मुलीला त्या दैत्य मामाने आई-वडिलांची नजर चुकवून निर्जन ठिकाणी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अमानुष पद्धतीने अनैसर्गिक कृत्य करीत कोवळ्या जीवाचे अक्षरशः लचके तोडले. आपण केलेले पाप उघडे पडेल या भीतीने त्या चिमुकलीचा तेथेच जीव घेतला. बऱ्याच वेळापासून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेतल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी प्रकरण उजेडात आले.
हृदय हेलावून टाकेल अशी घटना २० जानेवारी रोजी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र रोष, संताप आणि आक्रोश व्यक्त होत होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. आरोपीस ताब्यात द्या, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पो.नि. विकास पाटील यांनी आपल्या फौजफाट्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आरोपी बाबूराव माळेगावकर उर्फ बाबूराव उकंडू सांगेराव (वय ३५) यास घटनास्थळापासून काही अंतरावर अटक केली.
२१ रोजी पीडित मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हत्या, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अमानुष घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटून निषेध व्यक्त झाला. आरोपीस फाशी देण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी व सर्व पक्षियांकडून करण्यात आली. देशात घडणाऱ्या बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांची उजळणी झाली. ठिकठिकाणी शोकसभा, आदरांजली वाहण्यात आली. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, तृप्ती देसाई आदींसह अनेक सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते आले होते.
तपास अधिकारी पो. नि. विकास पाटील, स.पो.नि. शंकर डेडवाल, पो.उप.नि. अनिल कांबळे यांनी अवघ्या १९ दिवसांत तपास पूर्ण करून येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रकरणातील १५ साक्षीदार तपासले व शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून ४१ दिवसांत निकाल देत २३ रोजी न्या. एम.एस. शेख यांनी फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानुसार गुन्हेगाराला शिक्षा होणार असली तरी, ज्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे ते पीडित कुटुंब आता चिमुकलीच्या हाकेला कायमचे मुकले आहे. आरोपीस शिक्षा देताना न्या. एम.एस. शेख म्हणाले की, आरोपीने केलेले कृत्य निंदनीय, अमानुष आहे. घटनेबद्दल समाजाच्या भावना तीव्र आहेत. भविष्यामध्ये समाजात अशा घटना घडू नये याकरिता आरोपीला फाशी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे निकालाअंती म्हणाले.
(फोटो क्रमांक - २३एनपीएच एमएआर १४.जेपीजी - भोकर न्यायालय इमारत.
२३ एनपीएच एमएआर १५.जेपीजी - न्यायाधीश एम.एस.शेख)