नांदेड : नुकत्यात महावितरणच्यानांदेड सर्कलमध्ये करण्यात आलेल्या सर्वसाधारण बदल्या नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याच्या तक्रारी मुख्य अभियंत्यासह छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणच्या संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत संभाजीनगर येथील महावितरणचे तीन सदस्यीय पथक २९ व ३० ऑगस्ट रोजी चौकशीसाठी नांदेडात दाखल झाले होते. या पथकांकडून बदल्यांमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झाले काय? याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.
दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत. महावितरणमधील वर्ग १, वर्ग २ च्या बदल्यांचे आदेश संचालक, मुख्य अभियंत्यांच्या स्वाक्षरीने काढले जातात, तर वर्ग ३ च्या बदल्या अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने, तर वर्ग ४ च्या बदल्या कार्यकारी अभियंत्याच्या स्तरावर केल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अडथळे येऊ नयेत, त्यांना शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी प्रवेश मिळावा, यासाठी मे-जूनमध्येच सर्वसाधारण बदल्यांचे आदेश काढले जातात. परंतु, यावर्षी शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. त्याचा परिणाम अनेक कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली असून, पाल्यांना अर्धे शैक्षणिक सत्र सोडून इतरत्र प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या बदल्या करीत असताना विनंती, ज्येष्ठता व प्राधान्यक्रम याबाबत कुठलेही तारतम्य न ठेवता स्वत:च्या मर्जीनुसार बदल्या केल्याचा आरोप महावितरणच्या काही कर्मचारी संघटनेनेही वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत केला आहे.
नांदेड सर्कलमध्ये ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्यानांदेड सर्कलमधील ऑपरेटर, उच्चस्तर लिपिक, कारकून, टेक्निशियन अशा जवळपास ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधीक्षक अभियंता यांनी केल्या आहेत. या बदल्या करीत असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सोयीच्या ठिकाणी बदली देण्यास प्राधान्य देणे गरेजेचे आहे. असे असताना अधीक्षक अभियंत्याकडून यासंदर्भातील नियमांचे पालन न करता आपल्या मर्जीने बदलीचे आदेश काढल्याचा आरोपही केला आहे. अशा तक्रारी नांदेड सर्कलमधून अनेक संघटनांनी मुख्य अभियंता, तसेच संचालक महावितरण यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन चौकशीसाठी महावितरणच्या संभाजीनगर येथील कार्यालयातील पथकाने नांदेडात दोन दिवस मुक्काम ठोकला. आता त्यांच्या चौकशीतून कोणाचे बिंग फुटणार ? याकडे लक्ष लागले आहे.