लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. गैरव्यवहारासह विविध मुद्यांवर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक दिसून आले. चर्चेअंती अग्रीम रक्कम उचलूनही शौचालयाची कामे अपूर्ण असणा-या संबंधितांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला तर पंतप्रधान घरकुल योजनेत बोगस लाभार्थी घुसडल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे सभेने एकमताने मान्य केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेल्या या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, समाजकल्याण सभापती शीलाताई निखाते, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, महिला व बालकल्याण सभापती मधुमती देशमुख आणि कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्यासह नईमोद्दीन कुरेशी, आर. डी. तुबाकले आदींसह अधिकारी, पदाधिका-यांची उपस्थिती होती.सभेच्या प्रारंभी पुरात वाहून जाणा-या दोघांचे प्राण वाचविणाºया शिवराज भंडारवाड या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांनाही जि.प. अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले.सभेच्या सुरुवातीलाच माळाकोळी गटाचे जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील आक्रमक झाले. सभागृहात उपकर वाढीवर चर्चाच झाली नाही, तो विषय कसा काय मंजूर केला? असा प्रश्न त्यांनी केला. यावर तुबाकले यांनी तो आयत्यावेळचा विषय होता, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तीन गावे का वगळली? त्याचे अनुपालन अहवालात उत्तर का दिले नाही? असा प्रतिप्रश्न केला. यावेळी जि.प. सदस्या डॉ़ मीनल खतगावकर, लक्ष्मण ठक्करवाड यांनीही खुलासा केल्याशिवाय पुढचा विषय घेऊ नका, अशी मागणी करीत वाढीव उपकर कराबाबत ठराव घेण्याचा अधिकार सभेला नसल्याचे सांगितले. शेवटी प्रशासनाला नमते घ्यावे लागले. याप्रकरणी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेऊ, असे तुबाकले यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी आरोग्य केंद्राच्या ठरावासंबंधी साहेबराव धनगे प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले असता, काही काँग्रेस सदस्यांनीच त्यांना जाऊ द्या ना, म्हणून खाली बसविले.समाजकल्याण विभागाने अपंगांचे साहित्य तसेच शिलाई मशीन व इतर वस्तू वाटपाबाबत लाभार्थी निवड कोणत्या निकषावर केली, असा प्रश्न माणिक लोहगावे यांनी उपस्थित केला. मात्र या प्रश्नावरही प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेर उपाध्यक्ष समाधान जाधव तसेच सभापती शीलाताई निखाते यांनी हस्तक्षेप केला. अर्जच नसतील तर लाभार्थ्यांना लाभ कसा देणार? असा प्रश्न जाधव यांनी केला तर सभापती निखाते यांनी जे अर्जदार वंचित राहिले त्यांच्या याद्या द्या, पंधरा दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. यावेळी पूनम पवार यांनी कृष्णूरमधून अपंग प्रमाणपत्र नसतानाही २४ जणांची योजनेसाठी निवड झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असा शब्द सभागृहाला द्यावा लागला.जि.प. सदस्य साहेबराव धनगे यांनी तरोडा नाका येथील जिल्हा परिषदेच्या ३० एकर २० गुंठे जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर या जागेवर जिल्हा परिषदेने फलक लावला आहे. चतु:सीमेचा मुद्दा प्रलंबित असून त्याबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे वकील काय करतात? याचा आढावा घ्यावा आणि वकिलांकडून योग्य कार्यवाही होत नसल्यास वकील बदलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. हाच मुद्दा लक्ष्मण ठक्करवाड पुढे घेवून गेले. बिलोली पंचायत समितीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून कंम्पाऊंड वॉल बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच बीओटी तत्त्वावर तेथे गाळे बांधता येऊ शकतात, असे सांगितले. यावर शिष्टमंडळासह भेट देवून पाहणी करण्यात येईल, असे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी सांगितले.एनआरएचएममधून प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे प्रस्ताव देवून दोन महिने लोटले तरी त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचा मुद्दा मीनल खतगावकर यांनी उपस्थित केला. इतर जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असताना आपण मात्र मान्यतेतच गुंतल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन उपाध्यक्ष जाधव यांनी दिले.खतगावकर यांनी यावेळी खतगावच्या चार वर्षांपासून गैरहजर असलेल्या पशुसंवर्धन अधिका-याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सदर अधिका-याची विभागीय चौकशी झाली असून त्यास बडतर्फीची अंतिम नोटीस बजावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.घरकुल लाभार्थ्यांची होणार चौकशीपंचायत विभागावर चर्चा सुरू झाल्यानंतर या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंडेकर यांची चांगलीच कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. जि.प. सदस्या प्रणिता चिखलीकर यांनी पंतप्रधान घरकुल योजनेत बोगस लाभार्थी घुसडल्याचा आरोप केला. यावेळी नईम कुरेशी यांनी प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. पात्र असूनही ज्यांची नावे घरकुलच्या यादीत आली नाहीत, अशा लाभार्थ्यांची नावे ‘आवास प्लस’मध्ये घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.कामे अर्धवट असताना जिल्हा पाणंदमुक्तजिल्हा परिषद सदस्या प्रणिता चिखलीकर यांच्यासह मनोहर शिंदे यांनी स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयासाठी निधी उचलूनही काम पूर्ण केली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी या सदस्यांनी पैसे घेवून कामे न करणाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. जि. प. सदस्य रामराव नाईक यांनीही हा मुद्दा लावून धरीत या योजनेत अपहार झाल्याचाही आरोप केला. अखेर या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी जाहीर केले. समितीने दिलेल्या अहवालावरुन दोषींवर कारवाई करतानाच यातील निधीही वसूल करण्यात येईल, असे सांगितले.१५ दिवसांत विस्तार अधिका-याबाबत निर्णयविस्तार अधिका-यासह काही ग्रामसेवकांना हेतुपुरस्सर निलंबित केल्याचा मुद्दा जि.प. सदस्य साहेबराव धनगे यांच्यासह मनोहर शिंदे यांनी उपस्थित केला. पंचायत विभागातील अधिका-यांच्या हेकेखोरपणामुळे एका अधिका-याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. या विषयावरुन सभागृहात गदारोळ झाला आणि जि.प. सदस्यांनी याप्रकरणी पंचायत विभागाचे कोंडेकर यांच्यावर घणाघाती आरोप केले. अखेर बिंदूनामावलीचे काम झाले असून येत्या १५ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले तर या सर्व प्रकरणास जबाबदार असणा-यांची चौकशी करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
- डॉ़ मीनल खतगावकर यांनी उपकरवाढीच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले़ अनुपालन अहवालात स्पष्ट उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करीत या विषयावरील खुलाशा- शिवाय पुढील विषयावर चर्चा नको, असेही स्पष्ट केले़ समाज कल्याणच्या बृहत आराखड्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला़
- सभेत जि़प़ मालमत्तेच्या रक्षणाबाबत साहेबराव धनगे आग्रही होते़ घरकुल आणि स्वच्छ भारत अभियानासंबंधीही त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला़ विस्तार अधिकारी निलंबनाबरोबरच काही ग्रामसेवकांनाही हेतूपुरस्सर निलंबित केल्याचे सांगत या प्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली़
- पंतप्रधान घरकुल योजना राबविताना कंधार तालुक्यात बोगस लाभार्थी घुसडल्याचे प्रणिता चिखलीकर यांनी सांगितले़ या प्रकरणी आता चौकशी होणार आहे़ स्वच्छ भारत योजनेतील शौचालयासाठीचे पैसे उचलूनही कामे अर्धवट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले़या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे़
- चंद्रसेन पाटील यांनी उपकरवाढीच्या मुद्यावर अधिकाºयांना कोंडीत पकडले़ या विषयावर चर्चाच झालेली नाही, मात्र अनुपालन अहवालात तो विषय मंजूर झाल्याचे म्हटले आहे़ ही सभागृहाची दिशाभूल असल्याचे सांगितल्यानंतर याबाबत विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेवू असे स्पष्ट करण्यात आले़
- पूनम पवार यांनी कृष्णूरमधील २४ अपंगांची प्रमाणपत्रे नसतानाही निवड झाल्याचा मुद्दा उपस्थित केला़ त्यामुळे या लाभार्थ्यांची आता चौकशी होणार आहे़ एऩआऱएच़एम़ अंतर्गतच्या आरोग्य केंद्राच्या बांधकामाबाबतही दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़
- दशरथ लोहबंदे यांनी अपंग योजनेतील ८५ जणांना वगळल्याबाबत जाब विचारला़ लाभ दिल्याची तारीख सांगा असे म्हटल्यावर समाजकल्याण अधिकारी कुंभारगावे निरुत्तर झाले़ बंद शाळेवर नियुक्त ८० शिक्षकांबाबतही लोहबंदे आक्रमक होते़ अखेर आठ दिवसांत या शिक्षकांचे चालू शाळेत समायोजन करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले़