निवघा बाजार : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाचेपाणी परिसरातील शिरड, येळंब, धानोरा गावच्या शेतीपर्यंत पोहोचलेच नसल्याने मागील १५ दिवसांपासून या भागातील शेतकरी इसापूर धरणाचेपाणी कॅनॉलला आज येईल, उद्या येईल याच प्रतीक्षेत आहेत़ परंतु तळणी कालव्याला इसापूर धरणाचे पाणी सुटून १५ दिवस उलटले तरी अद्याप या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही़तर इसापूर धरणातून पाणी सोडण्याचा कालावधी संपण्याची वेळ आल्याने शिरड, येळंब, धानोरा शिवारात इसापूर धरणाचे पाणी येण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत़इसापूर धरणात यावर्षी ६९ टक्के पाणीसाठा असल्याने या वेळेस आपणापर्यंत कॅनॉलला पाणी येईल म्हणून शेतक-यांनी रबी हंगामातील हरभरा, गहू पीक पेरणी करण्यासाठी जमीन तयार केली आहे़इसापूरच्या पाण्यासाठी शेतक-यांना अनेक दिवस संघर्षही करावा लागला होता़ जवळपास २२ दिवस शेतक-यांनी पैनगंगेच्या पात्रात आंदोलन केले होते़ पंधरा दिवसांपूर्वी तळणी कालव्याला पाणी सुटले़ तेव्हापासून या भागातील शेतकरी चार दिवसांत येईल, आठ दिवसांत पाणी येईल म्हणून जमीन भिजविण्याकरिता लागणारे पाईप, स्प्रिंकलर, इंजीन आदी साहित्य घेवून रात्रीला शेतात शेतकरी जागरण करीत आहेत़परंतु अद्यापही परिसरातील अनेक गावांपर्यंत हे पाणी पोहोचलेच नाही़ पाण्याच्या मार्गावरही अनेक शेतक-यांना या पाण्याचा लाभ घेताच आला नाही़ दुष्काळामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकºयांची मात्र पंचाईत झाली आहे़
इसापूरचे पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:07 AM