लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश गावांना संजीवनी ठरलेल्या इसापूर धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण जवळपास ५५ टक्के भरले असून पाण्याचा येवा सुरूच आहे़ त्यामुळे पुढील रबी हंगामातील सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला असून खरिपातील पिकांनाही पाणी मिळेल़ त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़गतवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला़ परंतु, इसापूर प्रकल्पक्षेत्र असलेल्या बुलढाणा,वाशिम जिल्ह्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते़ गतवर्षी केवळ १४़१७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता़ अशीच स्थिती मागील चार वर्षांपासून होती़ २०१५-१६ मध्ये इसापूर ३५़१३ टक्के, २०१६-१७ मध्ये ४८़५८ टक्के तर गतवर्षी केवळ १४़१७ टक्के भरले होते़ त्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या जवळपास ८५ हजार हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता़ पाण्याअभावी गतवर्षी बहुतांश शेतकºयांना जिवापाड जपलेली केळी तोडून टाकावी लागली़ तर हजारो हेक्टरवरील ऊस आणि इतर पिकांना मोठा फटका बसला होता़ त्यामुळे या भागातील शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते़मागील चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा इसापूर प्रकल्प क्षेत्र असलेल्या बुलढाणा, वाशिम, हिंगोली तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ परिणामी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण ५५ टक्के भरल्याची नोंद झाली होती़ त्यामुळे आगामी दोन वर्षांतील पिण्यासह जवळपास खरीप आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे़इसापूर धरणावर तीन जिल्ह्यांतील ८५ हजार १९४ हेक्टर सिंचन अवलंबून आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरिपाचे १६ हजार ९३३ हेक्टर, रबीचे ४० हजार ७५ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे ४ हजार ५१५ हेक्टरचा समावेश आहे़ त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील खरीप-४ हजार २८ हेक्टर, रबी - ९५३३ हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १ हजार ७४ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील खरिपाचे ४ हजार ५९७ हेक्टर, रबी- १० हजार ८८० हेक्टर तर उन्हाळी हंगामाचे १२२६ हेक्टर जमीनक्षेत्र अवलंबून आहे़---तीनशेहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलानांदेडसह हिंगोली,यवतमाळ जिल्ह्यांतील जवळपास ३०० गावांची तहाण भागणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, मुदखेड, मुदखेड सीआरपीएफ कॅम्प यासह गरजेनुसार पाणी उपलब्ध करून दिले जाते़ त्याचबरोबर टंचाईच्या काळात नांदेड शहराला डाव्या कालव्याच्या माध्यमातून आसना नदीत पाणी सोडले जाते़ मागील वर्षात दोनवेळा इसापूरचे पाणी आसनामध्ये सोडण्यात आले होते़ त्यामुळे नांदेड उत्तरसह परिसरारातील दहा ते पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला होता़ दरम्यान, नांदेडसह कळमनुरी, ४० गाव माळपठार,८ गावे तिखाडी, भाटेगाव परिसरातील २७ गावे, डाव्या कालव्यावर असणारी इतर ४५ गावे अशा एकूण जवळपास तीनशे गावांना पंपहाऊस आण्रि कालव्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या जाते़
गतवर्षीच्या तुलनेत यंदा इसापूर धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे आगामी रबी हंगामात जवळपास ४ पाणीपाळ्या देण्याबरोबरच उन्हाळ्यातील पाणीपाळ्यांचे नियोजन करता येईल़ येत्या नोव्हेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीमार्फत पाणी वाटप, आरक्षण आदींचे नियोजन केले जाईल़ परंतु, सद्य:स्थितीतील उपलब्ध पाणीसाठा शेतकºयांसह पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर आधारित असलेल्या गावांना पातळीपातळीत होणारी वाढ दिलासादायक आहे़ अशाच पद्धतीने येवा सुरू राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल़- व्ही़ के़ कुरूंदकर, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प-१, नांदेड़