सिडको वसाहतीअंतर्गत असलेल्या योजना क्रमांक १ ते ४ मधील बहुसंख्य घरधारक हे गेल्या अनेक वर्षांपूर्वी सिडकोतील मूळ घरधारकांकडून बाँडपेपरच्या आधारे घरे खरेदी केलेली आहेत. अनेकांनी अनेक वर्षांपूर्वी घरे घेतलेली असल्याने ही घरे मूळ घरधारकांच्या अनुपस्थितीत व बाँडपेपरचे आधारे घरे हस्तांतरीत करण्याची मागणी करण्यात येत होत होती.
२००५ मध्ये सिडको प्रशासनाच्यावतीने मूळ घरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया काही दिवसांकरिता कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेचा काहीजणांना लाभ झाला आहे. मात्र, ही योजना फक्त काही दिवसांसाठी मर्यादित होती. अनेक घरधारकांनी तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हस्तांतरण योजना पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न केले. याशिवाय, ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी म्हणून विविध प्रकारचे आंदोलने केली.मात्र, सिडको प्रशासनाच्या वतीने बहुसंख्य घरधारकांच्या उपरोक्त मागणीला प्रतिसाद मिळाला नाही.
नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे यांनी घरधारकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व प्रलंबित असलेल्या मागणीकडे विशेष लक्ष घातले. आ. हंबर्डे यांनी औरंगाबाद येथील ‘सिडको’चे प्रशासक तसेच स्थानिक सिडकोचे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला. मुंबई येथे याच विषयावर पालकमंत्री चव्हाण यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आ. हंबर्डे यांच्यासह आ. बालाजी कल्याणकर, नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगराणे, सिडकोचे मुख्य प्रशासक एस. एस. पाटील, भुजंगराव गायकवाड, विकास अधिकारी कपिल राजपूत आदींची उपस्थिती होती.
मुंबई येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मूळ घरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्याची योजना विचाराधीन असून, याविषयी पुढच्या महिन्यात सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सदर योजनेसंदर्भात ठराव पास करून आदेश काढण्यात येतील. त्यानंतरच ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड येथील सिडकोचे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांनी दिली.