नांदेड : सरकारी शाळाच शिक्षणाचा कणा असायला हवा़ यातूनच सर्वांगिण विकास शक्य असल्याचे सांगत देशात शिक्षणाचे बजेट वाढविण्याची गरज दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी व्यक्त केली़ सरकारनेच शिक्षणाची जबाबदारी उचलावी़ निवडणुकांमध्येही शिक्षण हा प्रमुख मुद्दा झाला पाहिजे़ मंदिर, मश्जिद उभारल्याने काही फरक पडणार नाही़ मात्र शाळांमुळे देश उभा राहिल असेही ते म्हणाले़
एका कार्यक्रमानिमित्त सिसोदीया आज नांदेडात आले होते़ यावेळी ते म्हणाले, दिल्ली सरकारने गेल्या साडे तीन वर्षाच्या काळात शिक्षणाला अधिक महत्व दिले़ सरकारी शाळांचे रुपडे पालटले़ त्यामुळे खाजगी शाळातून प्रवेश काढून पालक आपल्या पाल्याला सरकारी शाळेत टाकत आहेत़ प्रवेशक्षमता संपल्यामुळे सरकारला नव्याने ८६० खोल्यांचे बांधकाम करावे लागले़ मंदिर, मस्जिद उभारल्याने काही फरक पडणार नाही़ त्यामुळे देशाचे नुकसान होणार नाही़ परंतु शाळा जर नसेल तर मात्र देशाचे मोठे नुकसान होणार आहे़ दिल्लीत राबविण्यात आलेले शैक्षणिक मॉडेल अनेक राज्ये आत्मसात करीत आहेत़ याचा आनंद आहे़ सर्वात वाईट असलेल्या शाळांचा दर्जा कसा वाढविता येईल यावर दिल्ली सरकारने प्रयत्न केले़ त्याला शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला़ देशाचे शिक्षणावरील बजेट वाढविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले़
कृष्णा यांचा दिल्लीत कार्यक्रम कर्नाटक येथील ख्यातनाम गायक टी़एसक़ृष्णा यांचा दिल्ली येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता़ आता आप ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ त्यावर सिसोदिया म्हणाले, कृष्णा हे मोठे कलाकार आहेत़ एका पक्षाच्या विरोधात बोलल्याने त्यांचा कार्यक्रम रद्द करणे निंदाजनक आहे़ कलाकाराशी तुमचे मतभेद असू शकतात़ पण कलेशी मतभेद नको़