नांदेड : फौजदारी आणि कौटुंबिक न्यायालयात वेगवेगळ्या साक्ष देणाऱ्या पत्नीला नांदवायला घेऊन जाणे सक्तीचे नाही, असा निकाल कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे़
संतोषसिंह चंदेल रा़मुंबई यांचे लग्न नांदेड येथील प्रिया (नाव बदलले आहे) यांच्याशी झाले होते़ परंतु लग्नानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे होऊ लागली़ त्यामुळे संतोषसिंह यांनी पत्नीपासून फारकतीसाठी कल्याण न्यायालयात धाव घेतली़ तर प्रिया हिने संतोषसिंह चंदेल याच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात अर्ज करुन पती नांदवायला घेऊन जाण्याची विनंती केली़ तसेच कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत फौजदारी न्यायालयातही कार्यवाही दाखल केली़ फौजदारी न्यायालयात प्रिया यांची साक्ष झाली़ त्यावेळी त्यांनी पतीसोबत संसार करण्याची इच्छा नाही व पोटगीच पाहिजे़ तसेच तिच्या इच्छेविरुद्ध हे लग्न झाले आहे असे सांगितले़ याउलट कौटुंबिक न्यायालयात पतीने नांदवायला घेवून जावे अशी साक्ष दिली़
संतोषसिंह चंदेल यांच्या वतीने अॅड़मंगल पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला़ भारतीय पुरावा कायदा ११५ अंतर्गत साक्षीदार कोणत्याही न्यायालयात एखादे वक्तव्य जाहीर केले व दुसऱ्या न्यायालयात त्याच प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पूर्वी केलेले वक्तव्य साक्ष जर फिरवित असेल तर अशा साक्षीदारावर विश्वास ठेवू नये़ त्यामुळे प्रियाने दाखल केलेले पतीकडे नांदवायला जाण्याचे प्रकरण खारीज करावे असा युक्तिवाद केला़ न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पत्नीचा पतीकडे नांदवायला जाण्याचा अर्ज खारीज केला़ चंदेल यांची बाजू अॅड़मंगल पाटील यांनी मांडली़ त्यांना अॅड़माया राजभोज, अॅडग़ोपिका गेठे यांनी सहकार्य केले़