नांदेड : राजकारणाची हवा मला कळते, असे सांगत देशात आता हवा बदलत असून चित्र बदलत आहे. या नव्या बदलाची नोंद घेण्याची वेळ आली आहे. याबाबत आपल्या मनात शंका नसून ही काही वावटळ नसून ही जनमाणसातील, लोकांच्या मनातील भावनांच्या पूर्ततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांचे निकाल हे बदलत्या हवेचे द्योतक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले़
नांदेड येथे जिल्हा बँकेत उभारण्यात आलेल्या पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी खा. तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी, देशातील राजकारणाची हवा शरद पवारांना कळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, अशी आठवण केली. त्याचा संदर्भ देताना खा़ पवार म्हणाले, आपल्याला राजकारणाची हवा कळते, आता देशाची हवा बदलत आहे़ या बदलत्या हवेची नोंद घेण्याची वेळ आली आहे. झालेल्या चार राज्याच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा बदलत्या हवेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशावर संकटाची परिस्थितीदेशात सध्या संकटाची परिस्थिती असल्याचे सांगितले़ पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले़ या हल्ल्यात देशाने जबरदस्त किंमत दिली असल्याचेही ते म्हणाले़ त्यातच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीही नुकतेच एक वक्तव्य करून जणू चिथावणी देण्याचेच काम केले आहे़ अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकजुट दाखवण्याची गरज आहे़ देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
बैठकीला सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला आम्ही सर्व कामे सोडून उपस्थित राहिलो़ या बैठकीत एक ठरावही घेण्यात आला़ राजकारणात मतभेद असतील, पण देशाच्या रक्षणासाठी आम्ही सर्व एक आहोत़ सरकारच्या बरोबर आहोत, असा ठराव घेण्यात आला़ केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधी हजर नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे बैठकीला उपस्थित होते़ मात्र ते मंत्री म्हणून उपस्थित होते, असेही ते म्हणाले.