बँकासह विविध फायनान्स कंपन्यांचे हप्ते थकल्याने वसुली करणारे बँकेचे प्रतिनधी घरापर्यंत येत आहेत. त्यात ग्रामीण भागातील कर्जदारांची संख्या अधिक असून, अनेकांची नोकरी गेल्याने कर्ज फेडणेही शक्य नाही.
सारीच कर्जे थकली; गृहकर्जाचे प्रमाण जास्त
राष्टीयीकृत बँकापासून ते पतसंस्थांपर्यंत सर्वांचीच कर्जे थकली आहेत. त्यात मध्यवर्ती बँकादेखील अपवाद नाहीत.
कोरोनाकाळात अनेकांनी नोकऱ्या गमवाव्य तर काहींच्या पगारात कपात केल्याने कर्जाची परतफेड करणे अवघड झाले आहे.
गृहकर्जासह शिक्षण, कार, दुचाकी खरेदीसाठी अथवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत.
दुचाकी खरेदीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, ज्या नोकरीसाठी दुचाकी घेतली ती नोकरीच कोरोनाने हिरावून घेतली. त्यामुळे बँकेचे हप्ते भरण्यासाठी सध्या कापड दुकानावर काम करत आहे. त्यात घरभाडे, हप्ता निघण्यास कसरत होते.
- महेश सूर्यवंशी, नांदेड
कोरोनापूर्वी घरबांधकामास सुरुवात केली. बँकेने लोनही केले. परंतु, कोरोना काळात नोकरी गमवावी लागली. त्यामुळे घराचे स्वप्न अर्धवटच राहिले. परंतु, काढलेले कर्ज भरण्यासाठी इतरांकडे उसणवारी घेऊन आर्थिक जुळावाजुळव करावी लागते.
- संतोष पाटील, नांदेड
गृहकर्ज, कार कर्जाची संख्या अधिक आहे. त्यात फायनान्स कंपन्यांचे कर्ज अधिक आहे.
या कंपन्यांकडून कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तकादा लावला असून, अनेकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
दुकान बंद पडले, कर्जकसे भरणार?
शहरातील एका पतसंस्थेकडून कर्ज घेऊन चहाचे दुकान टाकले होते. परंतु, लॉकडाऊनमध्ये दुकान बसले. अक्षरश: भाड्याचे पैसे द्यायला घरातील दागिने मोडले. परंतु, आजही परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे कर्ज कुठून फेडणार.
- गजानन वायचाळ, नांदेड
दोन वर्षांपूर्वी बँकेचे कर्ज काढून ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले. परंतु, सहा महिन्यातच कोरोनाचे आगमन झाले आहे. पूर्णपणे लाॅकडाऊन लागले. त्यात लग्न, समारंभ बंद असतानाही दुकानाचे भाडे सुरूच होते. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते पडले.
- स्वाती कदम, नांदेड
थकीत कर्जाबाबत अधिकारी म्हणतात....
अधिकारी म्हणून काम करत असताना संस्थेच्या नियमानुसार चालावे लागते. इच्छा नसूनही कर्जाची हप्ते थकलेल्या कर्जदारांची वाहने अथवा मालमत्ता जप्त कराव्या लागत आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जाते.
- बँक अधिकारी
गरजेच्या काळात जमीन, घर आमच्याकडे गहाण ठेवून कर्ज घेतले जाते. कोणतीही कंपनी तोटा सहन करणार नाही. परंतु, कोरोनाकाळात फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते थकूनही नोटिसा नाही काढल्या. परंतु, आता तरी लाेकांनी हप्ते भरावेत.
- फायनान्स अधिकारी