नांदेड : ड्रग्ज प्रकरणात सिनेअभिनेता शाहरूख खानचा ( Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान ( Aryan Khan ) हा आर्थर रोड तुरुंगात आहे. तुरुंगात आर्यन खानला साहित्य खरेदीसाठी साडेचार हजार रुपयांची मनिऑर्डर नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील एका चाहत्याने पाठविल्याचा दावा करण्यात येत आहे. या चाहत्याने मनिऑर्डरच्या पावत्याही पुरावेदाखल दिल्या.
देशभरात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला ८ ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्थर रोड तुरुंगात पाठविले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर्थर रोड तुरुंगाच्या पत्त्यावर आर्यन खानच्या नावे साडेचार हजार रुपयांची मनिऑर्डर केल्याचा दावा देगलूर येथील मोहम्मद जाकेर चाऊस यांनी केला आहे. तुरुंगात कैद्याला दर महिन्याला साडेचार हजार रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. त्यातून ते कॅन्टीनमधून खरेदी करू शकतात. तुरुंगात अशाप्रकारे पैशाची गरज पडते याची माहिती असल्यामुळे हे पैसे पाठविल्याचे जाकेर चाऊस म्हणाले. तसेच मनिऑर्डरच्या पावत्याही दाखवून पैसे पोहोचल्याचा पोस्टाचा संदेशही दाखविला. जाकेर चाऊस हे शाहरूख खानचे मोठे चाहते आहेत.