- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड) : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील मराठा समाजातर्फे दि.३१ मंगळवारी अर्धापूर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरुष, बालके व महिलांची उपस्थिती मोठी होती.
'जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षणाच्या चळवळीला जोर चढला आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी व जरंगे पाटील यांच्या समर्थनात आज पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज बांधवांनी दि.३१ रोजी अर्धापूर पोलीस ठाण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी पोलीस ठाणे दणाणले.
'मराठा समाजाची आजवर फसवणूक झाली आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत आमचा हक्क मागत आहोत. तो द्यायला सरकार तयार नसेल, तर तीव्र आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सध्या आम्ही शांततेत आंदोलने करत आहोत. यापुढे समाजाची फसवणूक झालेली आम्ही सहन करणार नाही. आमची लढाई कायदेशीर असून, आम्ही आमचा हक्क मिळवणार आहोत. मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूपाचे होईल अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिल्या.
वयोवृद्धांसह चिमुकली बालके ही आंदोलनात सहभागीआरक्षणाचा तिढा सरकारकडून सुटत नसल्याने व जरांगे पाटलांची तब्येत खालावत असल्याने आरक्षणाचा विषय आता जिव्हाळ्याचा झाला आहे वयोवृद्धांसह चिमुकली बालके शालेय विद्यार्थीही या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत.
तीन तासानंतर आंदोलक गावी परतले..जेलभरो आंदोलनासाठी अर्धापूर पोलीस ठाण्यात चोख पोलिस बंदोबस्त होता. पोलिस गाड्या तेथे थांबून होत्या. अनेक महिलांच्या भाषणानंतर घोषणाबाजी झाली. सदर आंदोलनाचे तीन तासांनी सामुदायिक राष्ट्रगीताचे गायन करून जेलभरो आंदोलनाचा समारोप करण्यात आला.