- राजेश वाघमारेभोकर : नातेवाईकाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करुन तेलंगणा राज्यातील वनेल, नवीपेठ येथे जात.असताना मोघाळीजवळ जीप पुलावरुन कोसळून एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले. तर ६ जण जखमी झाले आहेत. ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली.
भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंब वनेल, नवीपेठ ( जि. निजामाबाद, तेलंगणा ) येथे विटभट्टीच्या कामाला होते. सदरील कुटुंब भोकर शहरातील शेखफरीदनगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते. वाढदिवस साजरा करुन रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने ११ जण परत वनेल येथे जात होते. दरम्यान, उमरी रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरुन हे वाहन पुलावरून खाली कोसळून अपघात घडला.
या अपघातात सविता शाम भालेराव (२५), रेखा परमेश्वर भालेराव (३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (३०) प्रिती परमेश्वर भालेराव (८) सर्व रा. रेणापूर, ता. भोकर आणि सुशील मारोती गायकवाड (७) रा. रामखडक ता. उमरी या ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे - दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (८), प्रितेश परमेश्वर भालेराव (८), शोहम परमेश्वर भालेराव (७), श्याम तुकाराम भालेराव (३५), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (२८), परमेश्वर तुकाराम भालेराव (२८), श्रीकांत अरगुलवार आदी ६ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी श्याम भालेराव यांना नांदेडला अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. सागर रेड्डी, संगीता महादळे, पौर्णिमा दिपके, दिनेश लोटे हे उपचार करीत आहेत.
अपघात घडल्यानंतर नजीकच्या शेतकऱ्यांनी धावून येवून मदत केली. मयतातील तीन महिला नात्याने सख्या जावा आहेत. विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहन पाण्यात पडल्याने दोघींचा पाण्यात गुदमरुन मृत्यू झाल्याचे समजते. जखमी परमेश्वर भालेराव यांच्या पत्नीचा व जुळ्या पैकी प्रिती या मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड हे घटनास्थळी दाखल झाले होते.