जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला
शहरातील वजिराबाद हद्दीत सोमेश कॉलनी भागात सुदर्शन सखाराम एकशिंगे यांची दुचाकी घरासमोरून लंपास करण्यात आली. तर माहूर येथे सुरेश गायकवाड यांची प्रतीक कोपुलवार यांच्या घरासमोरून हीरो कंपनीची दुचाकी चोरट्याने लांबविली.
३० हजार रुपयांची सायकल लंपास
शहरातील गणेशनगर भागातून ३० हजार रुपयांची जईट कंपनीची सायकल चोरीला गेली आहे. व्यापारी अभिजित चंद्रकांत गव्हाणे यांनी ही सायकल घरासमोर उभी केली होती. भर दिवसा ही सायकल लंपास करण्यात आली.
आखाड्यावरून दोन गायी नेल्या सोडून
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाधर बाबूराव पाटील यांच्या आखाड्यावरून ५० हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरट्याने सोडून नेल्या. ही घटना १० जून रोजी घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
लाईट बंद झाल्याने शिवीगाळ
किनवट तालुक्यातील वाईबाजार येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना १६ जून रोजी घडली.
सुरेशसिंह मानसिंह राठोड हे कार्यालयात बसलेले असताना सूरज खोडके हा तरुण या ठिकाणी आला. त्याने लाईट बंद का केली? असे म्हणून राठोड यांना शिवीगाळ केली. तसेच टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. या प्रकरणात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
खंजर घेऊन फिरणारा अटकेत
शहरातील चंदासिंग कॉर्नर भागात जय महाराष्ट्र धाब्यासमोर खंजर घेऊन फिरत असलेल्या विश्वजीत गोपालसिंह ठाकूर (रा. दूधडेअरी) या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
भोकर येथे जुगार अड्ड्यावर धाड
भोकर शहरातील बालाजी मंदिर रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या वेळी पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. तर अन्य एका घटनेत मुक्रमाबादेत रामकृष्ण ऑटो मोबाइल दुकानासमोर मटका खेळताना आरोपींना पकडण्यात आले.
विष्णुपुरीत देशी दारू पकडली
विष्णुपुरी शिवारात लक्ष्मी पेट्रोल पंपासमोर अवैधपणे विक्री करण्यासाठी नेण्यात येणारी दारू पोलिसांनी पकडली. १५ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. दारू आणि दुचाकी असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.