नांदेड : ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाेकमत वृतपत्र समूहाने ‘रक्ताचं नातं’ ही रक्तदान चळवळ सुरू केली आहे. या चळवळीत तरुण, महिला व समाजातील सर्वच घटकांनी हिरिरीने सहभाग नाेंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेकराव चव्हाण यांनी केले आहे.
२ जुलैला बाबूजींची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून लाेकमत समूहाने ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेतला आहे. काेराेनाकाळात अनेक शस्त्रक्रिया थांबल्या; परंतु आता अनलाॅक झाल्याने थांबलेल्या शस्त्रक्रिया माेठ्या प्रमाणात हाेणार आहेत. त्यासाठी तेवढ्याच प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे; परंतु सध्या राज्यात रक्ताची टंचाई आहे. शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई आणखी वाढणार आहे. रक्ताची ही गरज भागविता यावी यासाठी ‘लाेकमत’ने रक्तदानाची चळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात शासनाच्या आराेग्य विभागाचे माेलाचे याेगदान लाभणार आहे. २ जुलैपासून दाेन आठवडे विविध समाज-संघटनांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे चालणार आहेत. समाजातील सर्वच घटकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी केले आहे. रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्यासाठी स्वत: रक्तदान करावे व इतरांनाही या समाजाेभिमुख कार्यासाठी प्राेत्साहित करावे, असे चव्हाण यांनी सांगितले. लाेकमतने सुरू केलेल्या या उपक्रमाचे मंत्री चव्हाण यांनी काैतुकही केले.