तालुक्यात दि.१ ते १६ डिसेंबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी २४५ आरोग्य पथकाने ता.आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ता.पर्यवेक्षक शेख शादूल, कुष्ठरोग तंत्रज्ञ इ.बी.पठाडे, क्षयरोग पर्यवेक्षक एस.ए.मुक्कनवार, सिंधुताई केसाळे यांच्या सूचनेनुसार आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी आदींनी घरोघरी भेटी देऊन शोध मोहीम राबविली.
तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या गावात २ लाख ८ हजार ९४८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात कुष्ठरोगाचे ५१२ संशयित रूग्ण आढळले. तपासणीअंती १२ जण कुष्ठरोगाचे रूग्ण आढळले. त्यात बारूळ प्रा.आ.केंद्रातील गावात ३, पेठवडज ४, कुरूळा १ व पानशेवडी अंतर्गत गावातील ४ रूग्णांचा समावेश आहे. उस्माननगर केंद्रातंर्गत एकही रूग्ण आढळला नाही.
क्षयरोगासाठी २ लाख ७ हजार ९१७ नागरिकांची तपासणी केली. त्यात ४२१ संशयित रूग्ण आढळले. ४२१ जणाचे स्पुटन घेतले व काहीचे एक्सरे काढण्यात आले. त्यात एकूण ८ जण पॉझिटिव्ह आढळले. बारूळ प्रा.आ.केंद्राअंतर्गत गावात २ ,उस्माननगर २ ,पेठवडज २ व कुरूळा अंतर्गत असलेल्या गावात २ जण पॉझिटिव्ह आढळले. परंतु पानशेवडी केंद्रातंर्गत गावात एकही रूग्ण आढळला नाही.
संयुक्त शोधमोहीम कालावधी वाढला
तालुक्यात १ ते १६ डिसेंबर अशी संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली.परंतु आणखी कालावधी वाढविला असल्याचे समजते.३१ डिसेंबर पर्यंत मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. वाढीव कालावधीत किती संशयित रूग्ण आढळतात व निदान केल्यावर किती रूग्ण संख्येत वाढ होणार हे नंतर समजेल.