नांदेड : वाळूच्या प्रकरणात अगोदर पन्नास हजार रुपयांची खंडणी उकळल्यानंतर तहसिलदारांकडून पुन्हा एक लाख रुपये स्विकारणाऱ्या मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे़ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली़ न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे़
माहूरचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांच्या विरोधात अनेकवेळा अर्ज देवून त्याबाबत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या यापुढे तक्रारी न करण्यासाठी माहूरचे मनसे तालुकाध्यक्ष गजानन प्रभाकर कुलकर्णी, किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश पोहरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दुर्गादास राठोड, पत्रकार अंकुश भालेराव, राजकुमार नारायण स्वामी आणि कामारकर या सहा जणांनी दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती़ त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी वरणगावकर यांच्याकडून यापूर्वीच घेतले होते़ उर्वरित एक लाख रुपये २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देण्याचे ठरले होते़
याबाबत तहसिलदार वरणगावकर यांनी पोलिसांना माहिती दिली़ त्यानुसार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला़ या ठिकाणी आरोपींना वरणगावकर यांच्याकडून खंडणी स्वरुपात एक लाखांची रक्कम घेताना पकडण्यात आले़ यामध्ये कामारकर वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे़ न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़