नांदेड : मुखेड तालुक्यातील बामणी येथील सुधाकर शिंदे हे आयटीबीपीमध्ये कार्यरत असताना छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ते शुक्रवारी शहीद झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना रोजमजुरी करून शिक्षण घेत उपअधीक्षक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने बामणी गावावर शोककळा पसरली असून हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मार्गदर्शकही हरविला आहे.
बामणी हे गाव तसे लहानच. सुधाकर शिंदे यांनी गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुक्रमाबाद येथील भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयात ते होते. हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु कुटुंबाला त्यासाठी किती वेळा पैसे मागणार म्हणून ते थेट मजुरीकडे वळले. शेतावर शेतमजूर, त्याचप्रमाणे नदीवर वाळू चाळण्यासाठी ते रात्रपाळीला काम करीत होते. मिळालेल्या पैशातून कुटुंबाला हातभार लावत स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेऊन त्यांनी तयारी केली होती.
२००२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले होते. २००४ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांना चंदीगढ येथे पदोन्नतीही मिळाली. २०१९ मध्ये सरकारने त्यांना पदोन्नती देत छत्तीसगड येथील नारायणपूर येथे आयटीबीपीत पोलीस उपअधीक्षक म्हणून पाठविले होते.
शुक्रवारी सकाळी नारायणपूर येथे रोड ओपनिंग करीत असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. शिंदे आणि त्यांचा सहकारी गुरुमुखसिंग यांनी प्रत्त्युत्तर दिले.
परंतु माओवाद्यांची संख्या जास्त असल्यामुळे या दोघांनाही वीरमरण आले. ही वार्ता बामणी गावात कळताच अख्खे गाव शोकसागरात बुडाले होते. शिंदे यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटणारा होता.
अनेक राज्यात शिंदे यांनी बजाविली सेवा
२००४ ते २०१३ या दरम्यान शिंदे यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली व छत्तीसगड येथे आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षा अंतर्गत देशविदेशातील सुरक्षेची जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडली होती. शिंदे यांच्या अंगी असलेली कुशल व कार्य करण्याची तत्परता पाहून सरकारने त्यांना २०१३ ते २०१९ या काळात राष्ट्रीय आपदा प्राधिकरणमध्ये पथक प्रमुख म्हणून पाठविले होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती भवन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासह रासायनिक, जैविक, दहशतवादी हल्ला पथकात त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले.