भोकर : दिवशी बु. (जिल्हा नांदेड) येथील एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणातील आरोपी बाबुराव माळेगावकर ऊर्फ बाबुराव उकंडू सांगेराव यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी फाशीची शिक्षा दि. २३ रोजी सुनावली आहे.
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे दि. २० जानेवारी रोजी सालगडी असलेल्या आरोपीने पाच वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन क्रुर हत्या केली होती. त्याच दिवशी सायंकाळी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. याबाबत मयत चिमुकलीच्या वडिलांनी भोकर पोलिसात दि. २१ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरुन सालगडी बाबुराव उकंडू सांगेराव विरुद्ध हत्या आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून व समाजातील रोष पहाता या प्रकरणाचे तपास अधिकारी पो. नि. विकास पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १९ दिवसात तपास पूर्ण करुन दि. १० फेब्रुवारी रोजी आरोपी विरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने ३९ जणांची साक्ष तपासली तसेच वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुराव्यावा ग्राह्य धरुन आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी बाबूराव उकंडू सांगेराव यास फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड रमेश राजुरकर यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने ४१ दिवसात या प्रकरणात न्याय निवाडा केला आहे.