नांदेड- रामदास कदम आणि रविंद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांनी रस्त्यावर उतरुन कुस्ती लढवावी. ती कुस्ती बघण्यासाठी मी तिथे येईल. त्यासाठी पंच म्हणून काम करायलाही माझी तयारी आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्करराव जाधव यांनी टोला लगाविला. उबाठा गटाचे नेते भास्करराव जाधव आणि उपनेते मनोज जामसुतकर हे मंगळवारी नांदेडात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले होते.
यावेळी जाधव म्हणाले, दुसऱ्या पक्षात काय सुरु आहे याकडे माझे लक्ष नसते. मात्र रामदास कदम आणि रविंद्र चव्हाण हे दोघेही कोकणातील आहेत. हे दोघेही नेते एकमेकांवर टिका करीत आहेत. त्या सर्व टिका आणि आक्रमक बोलणे मी बारकाईने ऐकले आहे. त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. मी कोकणातील असल्याने ते दोघे कधी रस्त्यावर येतील अन् त्यांची कुस्ती होईल याकडे माझे लक्ष आहे. ज्यावेळी हे दोघे रस्त्यावर येवून कुस्ती खेळतील त्यावेळी त्यांची कुस्ती पाहण्याची माझी इच्छा आहे. जमल्यास त्या ठिकाणी मी पंचगिरी करेल. सरकारने लाडकी बहिण योजना आणली. परंतु यापूर्वी देखील संजय गांधी निराधार, कन्यादान, वयोवृद्धांसाठी योजना, पेन्शन योजना पूर्वीच्या सरकारांनी आणल्या आहेत. त्यामुळे यात नवीन काही नाही. त्यामुळे योजनेचा सरकारला फायदा होईल असे वाटत नाही. प्रसिद्धी करुन ही योजना आणली. तरीही २१ वर्षापूर्वीच्या आणि ६५ वर्षावरील बहिणी लाडक्या नाहीत का? आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या लाडक्या बहिणी नाहीत का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
आडकाठी कोण घालतो आहे? मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलतात? यापेक्षा मराठा समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी त्यात फुट पाडण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले हे उघड झाले आहे. आरक्षण मिळू नये म्हणून आडकाठी कोण घालतो आहे? त्याला देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत असा आरोपही जाधव यांनी केला.