धर्माबाद : नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे गणेशराव पाटील करखेलीकर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची निवड झाली. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना अशी युती होवून ही निवड करण्यात आली.२६ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात सभापती, उपसभापती निवडीसाठी संचालकांची बैठक घेण्यात आली. सभापतीपदाचे करखेलीकर यांना १० तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या गोदावरीबाई दत्तात्रय कदम यांना ८ मते मिळाली. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत बन्नाळीकर यांनी कॉग्रेसचे वर्णी नागभूषण यांचा २ मतांनी पराभव केला. बन्नाळीकर यांना १० तर वर्णी नागभूषण यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ होते. त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मवीर कलेटवाड, तहसीलदार ज्योती चौव्हाण, नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी सहकार्य केले.बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे ८, काँग्रेसचे ४, भाजपाचे २ आणि शिवसेनेचे १, व्यापारी, हमाल अपक्षाचे ३ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्माबादेत मोठ्या हालचाली झाल्या. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या गोदावरीबाई दत्तात्रय कदम यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश मिळवून मोठी धमाल उडवून दिली. काँग्रेसने त्यांना सभापतीपदाची उमेदवारीही दिली, मात्र काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपाचे भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादीचे माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी तडजोड केल्याने वरीलप्रमाणे समीरकरण जुळले. यानिमित्ताने काँग्रेसला पर्यायाने आ. वसंतराव चव्हाण यांनाही चपराक बसली. राष्ट्रवादीसोडून काँग्रेसमध्ये गेलेले दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांनाही धडा बसला .दरम्यान, निवड घोषीत होताच माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी नूतन सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करुन कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
बाजार समिती निवडणुकीनंतर ज्या पक्षाला बहुमत असेल, त्याला पाठिंबा देणार, असे म्हणणाऱ्या दोन संचालकांनी शब्द पाळला नसल्याने भाजपाशी युती करावी लागली- विनायकराव कुलकर्णी, संचालक, राष्ट्रवादी