नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी महाराष्ट्राच्याराजकारणात एंट्री घेतली आहे. आज केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधोरेखित केले. यावेळी त्यांनी तेलंगणात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
या वर्षी तेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपही जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून केसीआर भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. या नामकरणापासून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात एंट्री घेतली. यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रातील राजकारणातही एंट्री घेतली आहे.
नांदेड येथील सभेत केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 75 वर्षात कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. अनेकजण आमदार-खासदार झाले, पण शेतकऱ्यांसाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच राजकारणात यावे लागेल. शेतकऱ्यांनो उठा आणि तुम्हीच आमदार-खासदार व्हा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे सरकार येणार नाही, तोपर्यंत तुमचे म्हणने कुणीच ऐकणार नाही. आतापर्यंत कोणत्याच सरकारने असा नारा दिला नाही, अब कि बार किसान सरकार...अशी गर्जना केसीआर यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे, ही खेदाची बाब आहे. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे सरकार आल्यावर या सर्व समस्या नाहीशा होतील. तेलंगणामध्ये लोकांनी शेतकऱ्यांचे सरकार निवडून दिले, तुम्हीचे तशाच प्रकारचे काम करा.
चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, देशाला अन्नधान्य देणारा अन्नदाता, दिवसभर कष्ट करून कशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो याचे कारण काय? यावर विचार करण्याची गरज आहे. नेते मोठे भाषण देतात. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पीक थांबायला तयार नाही. त्यामुळे आता आम्ही नारा देतोय अबकी बार किसान सरकार! देशात शेतकऱ्यांची संख्या 42 टक्के पेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि कामगार मिळून 50 टक्के पेक्षा जास्त होतात. हे दोघे एक झाले तर सरकार बनवायला अवघड नाही.
आम्ही आज नांदेडमध्ये सभा घेतली, यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येत शहरात जाऊ. बीआरएस पक्ष प्रत्येत शहरात आपला प्रचार-प्रसार करणार. आमचे नेते तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतील. कोणाला काहीही अडचण आल्यावर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुम्हाला मदत करू. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर जाऊन शपथ घेऊन पक्षविस्ताराला सुरुवात करणार आहोत, अशी माहितीही केसीआर यांनी दिली.