हदगाव ( नांदेड ): तालुक्यातील एकमेव असलेल्या केदारगुडा येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या गाद्या गेली पाच वर्षांपासून बदलल्याच नाहीत़ शालेय साहित्यही भंगार झाल्याचे पाहून आश्वासन विधिमंडळ समितीने संताप व्यक्त केला.
बुधवारी रात्री ७़३० ते १० अडीच तास या शाळेची कसून चौकशी करण्यात आली़ या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणार्या शालेय साहित्याचा दर्जा कनिष्ठ असल्याचे समितीने नमूद केले तर सन २०१२ मध्ये झोपण्यासाठी देण्यात आलेल्या गाद्याही बदलण्यात आल्या नाहीत़ या गाद्या नॉयलॉनच्या आहेत़ त्यामुळे त्या चपटून गेलेल्या आहेत. पुस्तके व इतर साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या पेट्याही भंगार झाल्या आहेत़ विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या आहाराचे नमुने या समितीने तपासणीसाठी नेले़ तांदूळ नागपूरहून, तूरडाळ लातूरहून, गहू पुण्याहून असे हे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असल्याचे समितीला सांगण्यात आले़ अंथरूण, पांघरूणचा दर्जा, थंडीसाठी दिले जाणारे स्वेटर याविषयी सहाय्यक आयुक्तांना समितीने धारेवर धरले़.
स्त्री अधीक्षक पद अनेक वर्षांपासून रिक्त होते़, परंतु ते भरल्यामुळे मुलीच्या समस्या मिटल्या़ पुरुष अधीक्षक पदही सध्या भरले असून रिक्त शिक्षकांची पदे तूर्त भरली़ या समितीच्या गाड्याचा ताफाच शाळेत गेल्याने कर्मचार्यांची भंबेरी उडाली़ विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवितात की नाही याविषयी अनेक प्रश्न समितीने केले़ शाळेचा लेखी अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ शुक्रवारी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़
व्यवस्थापन समितीची पाचावर धारणआश्वासन समितीच्या सदस्यांनी केदारगुडा येथील आश्रमशाळेची पाहणी केल्यानंतर तेथील गंभीर परिस्थिती पाहून संताप व्यक्त केला़ यावेळी व्यवस्थापनावर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती़