नांदेड : जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी शासकीय रुग्णालयांची मोठी साखळी असताना या ठिकाणी प्रसूतीसाठी येत असलेल्या अनेक महिलांना परत पाठविले जाते. ग्रामीण भागातून तर सर्रासपणे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे बोट दाखविले जाते. शासकीय रुग्णालयात होत असलेल्या या हेळसांडीला कंटाळून मग रुग्णाचे नातेवाईक थेट खासगी रुग्णालय गाठतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती विभागात तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका आहेत. या ठिकाणी सिझेरियनपेक्षा नॉर्मलवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी दररोज अनेक महिला प्रसूतीसाठी येतात.
विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोना काळात पाच हजारांहून अधिक प्रसूती करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी महिला येतात. येथे प्रसूतीपूर्व करण्यात येत असलेल्या अनेक अवघड शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. तसेच नॉर्मल प्रसूती करण्यावरच अधिक भर असतो. पर्यायच नसेल तर सिझेरियन केले जाते. या ठिकाणी असलेल्या खाटांच्या क्षमतेपेक्षाही अधिक रुग्ण दाखल होत असल्याने अडचण होते.
शासकीय रुग्णालयांत नॉर्मल, खासगीत सिझर !
n अनेक खासगी रुग्णालयांनी सिझेरियनचा सपाटा सुरू केला आहे. रुग्णाच्या नातेवाइकांना पाणी कमी झाले, नाळ अडकली यासह वेगवेगळी कारणे सांगून सिझेरियन करण्यास भाग पाडले जाते. प्रत्येक रुग्णालयात सिझेरियनसाठी वेगवेगळी पॅकेजच ठेवण्यात आली आहेत. या उलट शासकीय रुग्णालयात मात्र कितीही किचकट परिस्थिती असो प्रसूती नॉर्मल करण्यावरच अधिक भर दिला जातो.