पंजाब पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद संघटनेशी संबंधित चार जणांविरूद्ध बंदी आदेश जारी केले होते. त्यापैकी एक जण नांदेड येथे असल्याची गुप्त माहिती पंजाब राज्य पोलीस दलाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पंजाब पोलीस नांदेड येथे आले होते. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब पोलिसांच्या मदतीने नांदेड तहसील कार्यालय परिसरातून आरोपीला सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर प्रवासी रिमांडवर त्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, पंजाब पोलीस पथक अधिकारी व त्यांचे कर्मचारी सहभागी होते.
आरोपीच्या शोधासाठी नांदेड येथे आल्यानंतर पंजाब येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पंजाब पोलिसांच्या पथकाने कायदेशीर कागदपत्र पोलीस अधीक्षकांसमोर सादर करून त्यांना सविस्तर माहिती दिली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर या आरोपीस पकडण्याची जबाबदारी सोपविली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती व पंजाब पोलीसचे इन्टेलिजन्ट पथकाकडून नांदेडमध्ये दोन दिवस गोपनीय ऑपरेशन चालवले. यानंतर या पथकाने त्याला अटक केली.
चौकट.....
हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट
खलिस्तान जिंदाबाद या संघटनेच्या दहशतवाद्याना बेल्जियम या देशातून पैसे पुरविले जातात. किरत आणि त्याचे सहकारी दहशतवादी कारवायांसाठी पैसे, शस्त्रे जमविण्याचे काम करीत होते. खलिस्तानला विरोध करणाऱ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट त्यांनी रचला होता. पंजाब पोलिसांनी याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.