नांदेड : मनपाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश येवले हे गुरुवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेला संपूर्ण पदभार सहायक आयुक्त गीता ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबरोबरच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मनपा आयुक्तांनी शुक्रवारी जारी केले.या बदल्यानुसार सहायक उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडे आता क्षेत्रीय कार्यालय (१ ते ६), मालमत्ता विभाग आणि अनधिकृत बांधकाम या विभागांचा प्रभारी उपायुक्त म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. अंतर्गत लेखा परीक्षक विलास भोसीकर यांच्याकडे स्टेडियम विभागाचा प्रभारी उपायुक्त म्हणून पदभार देण्यात आला आहे. विधि अधिकारी अजितपालसिंग संधू यांच्याकडे आता अग्निशमन विभाग, एन.यु.एल.एम. आपत्ती व्यवस्थापन, जनसंपर्क आणि निवडणूक विभागासह जनगणना, ग्रंथालय, अतिक्रमण आणि कर विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.दरम्यान, आयुक्तांनी शुक्रवारी ६ अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना केली आहे. जकात अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालय क्र. १ (तरोडा-सांगवी) हे विभाग होते. त्यांची आता कर विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. मुख्य लेखापाल अविनाश अटकोरे हे क्षेत्रीय कार्यालय क्र. ४ (वजिराबाद) येथे कार्यरत होते. त्यांच्याकडे मालमत्ता विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अभिलेख पर्यवेक्षक पंडित पेमो जाधव क्षेत्रीय कार्यालय क्र. ६ (सिडको) येथे कार्यरत होते. आता त्यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून जबाबदारी राहील. भांडारपाल विलास मठपल्लेवार यांची क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय कार्यालय क्र. १ (तरोडा-सांगवी) येथे पदस्थापना करण्यात आली आहे.तर वरिष्ठ लिपीक नंदकुमार कुलकर्णी आयुक्त कक्षात कार्यरत होते. त्यांना क्षेत्रीय अधिकारी कार्यालय क्र. ३ (शिवाजीनगर) ची जबाबदारी देण्यात आली आहे. या बरोबरच वरिष्ठ लिपिक प्रकाश गच्चे तरोडा-सांगवीसाठीच्या क्षेत्रीय कार्यालय क्र. १ मध्ये होते. आता त्यांच्यावर क्षेत्रीय कार्यालय क्र. ४ (वजिराबाद) ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबरोबरच सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक रावण सोनसळे हे आता क्षेत्रीय कार्यालय क्र. ६ (सिडको) ची जबाबदारी सांभाळतील. सदरील आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
महानगरपालिकेत खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:56 AM