किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना बाधित केले. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना झाल्यानंतर काही आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात किडनी, हृदयविकार, पोटदुखी आदी आजार असलेल्यांनी आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. त्यात किडनीचा आजार असलेल्या रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर त्या रुग्णाची पूर्वपरिस्थिती माहिती असलेल्या डाॅक्टरांशी सल्लामसलत करूनच उपचार करणे आवश्यक आहे.
फॅमिली डाॅक्टरांशी विचारून घ्या स्टेरॉईड
कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांवर स्टेराॅईडचा अतिरेकी वापर केल्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे स्टेराॅईडचे प्रमाण किती असावे आणि त्या रुग्णाची पूर्वपरिस्थिती, आजार माहिती असणाऱ्या त्यांच्या फॅमिली डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोरोनासाठी औषधोपचार घ्यावेत.
हे करा
कोरोनाची लाट कमी होत असली तरी बाजारपेठेतील गर्दीत मात्र झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नियमितपणे वाफ घेणे, पाैष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. रुग्णालयात अथवा बाजारपेठेत जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ताप, थंडी, दमा, डोकेदुखी अशा प्रकारचे कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, दोन किंवा तीन दिवसापेक्षा अधिक दिवस आजार असेल तर कोरोना चाचणी करून घ्यावी.
हे करू नका
कोरोना आजार झाल्यानंतर घरीच उपचार घेण्याचा अट्टाहास नको. रुग्णाची परिस्थिती पाहून तो निर्णय डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. कोणत्याही प्रकारचा आजार अथवा अंगदुखी असेल तर मेडिकलवरून गोळ्या-औषधी स्वत:च नका आणू, त्यासाठी किमान आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.