गेल्या तीन महिन्यांपूर्वी मोखंडी या गावांमध्ये वीज भारनियमन टाळण्याच्या दृष्टीने सिंगल फेजचा नवीन डीपी बसविण्यात आला. तसेच गावात १४ लाईटचे नवीन पोल बसविण्यात आले. मात्र सदरील कंत्राटदारास बिल अदा केले नसल्याने अद्याप पावेतो या डीपीला वीज पुरवठा जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे या डीपीचा गावकऱ्यांना कसलाच फायदा होत नाही. या भागातील वस्तीला वीज पुरवठा होत नसल्याने तीन महिन्यांपासून येथील रहिवाशांना दररोज अंधारात राहावे लागत आहे. तसेच गावातील जलशुद्धीकरण आरओ प्लांट विजेअभावी बंद पडला आहे. त्यामुळे गावातील लोकांना पिण्यासाठी अशुद्ध पाण्याचा वापर करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत पाणीपुरवठा विहिरीवरील मोटार दुरुस्ती, तसेच पाण्याची टाकी आदी कामांची बिले देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार सरपंच सुशिलाबाई आडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे मूल्यमापन करण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत या बांधकामाचे बिल अदा करण्यात आले नाही. याबाबत संबंधित कंत्राटदारामार्फत सरपंच यांच्याकडे सतत तगादा होत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच आडे यांनी केली आहे.
पुस्तक भेट, गाणी, मुलाखतीने अपंग दिन रंगला
जागतिक अपंग दिन: अंध विद्यार्थी गायक अंकुश खंडेलोटे याचा गौरव
उमरी : तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, तळेगाव येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
तळेगाव येथील रहिवासी व देगलूर येथील मानव्य विकास विद्यालयात शिकणारा अंध विद्यार्थी अंकुश खंडेलोटे याचा रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ व बालभारतीचा ‘किशोर’ दिवाळी अंक देऊन सत्कार करण्यात आला. अंकुश सुरेश खंडेलोटे याने यावेळी देशभक्तीपर गीते, धार्मिक भक्तीगीते, भावगीते, भीमगीते आपल्या सुरेल आवाजात सादर करून मंत्रमुग्ध केले.
तद्नंतर शिक्षक नंदकिशोर परळीकर यांनी अंध विद्यार्थी गायक अंकुश खंडेलोटे याची सविस्तर मुलाखत घेतली. वेगवेगळ्या शासकीय सवलती व योजनांमुळे शिक्षण घेणे सुखकर होते आहे . असे अंकुश याने आपल्या मुलाखतीत सांगितले. शासनाबद्दल व त्याला आजवर लाभलेले संगीत शिक्षक पंकज शिरभाते, पंचशील सोनकांबळे, राजपाल माथुरे, मार्तंड भुताळे, तसेच मानव्य विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास कोळनूरकर, मौलाना शेख, अजमल खान आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.