हदगाव : शहरापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेला व नगर परिषदेअंतर्गत येणारा हुलकानेतांडा स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावाला साधा रस्ताही नसल्यामुळे येथील नागरिकांना आपण शहरालगत राहत नसून एखाद्या जंगलात राहत असल्याचाच अनुभव येतो.५0 ते ६0 घरे असलेला हा तांडा शहरालगतच आहे. हदगावच्या मोठमोठय़ा हस्तीचे शिवार येथे आहे. हुलकाने यांच्या शेतात सालगडी म्हणून राहत असणारे पूर्वीचे बंजारी यांचे एकच घर होते. हळूहळू येथे वस्ती वाढली. आजूबाजूला जंगल असल्यामुळे जंगलातील शिकार करुन आपली व कुटुंबाची उपजीविका भागविणारे बंजारी येथील शेतकर्यांच्या संपर्कात आले व त्यांनी शेती कसायला सरुवात केली.देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटले परंतु या तांड्याच्या मूलभूत सुविधा अपूर्णच आहेत. येथे शासनाची फक्त जि.प. शाळा आहे. बाकी कोणत्याच सुविधा नाहीत. प्रत्येक गावाच्या शेजारी तांडा असतो. तो त्या गावाच्या ग्रामपंचायतीस जोडला गेला व त्याचा विकासही झाला. गावात नळयोजना, वीज, आरोग्य, शिक्षण या सुविधा आल्या परंतु येथे मात्र कोणतीच सोय नाही. येथे नेहमीच गुडघ्याएवढे उंचीचे गवत असते व परिसर निर्जन्य असल्यामुळे साप, विंचू यांचेही प्रमाण भरपूर असते. बाहेरगावी पाहुण्यांकडे गेल्याने आमचे गाव हदगाव म्हणून सांगणार्या या ग्रामस्थांना शहरातील कोणतीच सुविधा मिळत नाही. शहराचा होणारा विकास पाहून यांचाही ऊर भरुन येतो. दिवसभर येथील ग्रामस्थ मोठय़ा दिमाखाने शहरात फिरतात व रात्री गावाकडे जाताना मात्र त्यांना रस्त्याचा होणारा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही. तांड्यावरील एखादा नाईक एका पार्टीचे वाजवितो तर दुसरा नाईक दुसर्या पार्टीचे वाजवितो. एकमेकाच्या जिवावर उठतात, परंतु विकासासाठी एकत्र येऊन मागणी करीत नाही. त्यामुळे प्रतिनिधीचे फावते. निवडणुकीवेळी दारु-मटनच्या ओल्या पाटर्य़ाही होतात. निवडणूक संपली की, रस्त्याच्या चर्चाही संपतात. आता तरी नवीन आमदार याकडे लक्ष घालतील का? अशी चर्चा रंगत आहे./ ■ येथे बाकी सुविधांची आवश्यकता नाही. फक्त दळणवळाची सोय झाली तरी हदगाव शहरातील सर्वच सुविधांचा त्यांना फायदा घेता येईल. परंतु शेतीकडे जाण्यासाठी पाणंदरस्ता चांगला असतो परंतु या तांड्याकडे जाण्यासाठी तसाही रस्ता उपलब्ध नाही. हा रस्ता करुन देतो म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्यांना शब्द दिला खरा परंतु पाळला कोणीही नाही. पावसाळा व हिवाळ्यात ही मंडळी पायी चालण्यासाठी अंतर कमी व्हावे यासाठी सिंचन विभागाच्या कार्यालयातून ये-जा करतात.
सुविधांपासून कोसोदूर
By admin | Published: November 06, 2014 1:43 PM