नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने अवघ्या ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीची उपलब्धता आणि कोणत्या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांना देण्यात प्रशासन कमी पडत असल्याने नागरिकांची धावाधाव होत आहे. सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने दीड लाख लसींची मागणी केली आहे. परंतु, मंगळवारी जिल्ह्यासाठी ३ हजार कोव्हॅक्सिन तर १० हजार कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला. यातील १,४०० कोव्हॅक्सिन नांदेड शहरासाठी देण्यात आल्या. महानगरपालिकेने शहरातील हैदरबाग तसेच जिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे नांदेड शहरातील १३पैकी या दोनच केंद्रांवर नागरिक लसीकरणासाठी आले होते. मात्र, ग्रामीण भागातील नेमकी किती केंद्र सुरू राहणार? याची कसलीही माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना देण्यात आली नाही. त्यामुळे बंद असलेल्या लसीकरण केंद्रांवरही नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. सध्या जिल्ह्यात ४३२ लसीकरण केंद्र आहेत. यातील ३७५ केंद्र ग्रामीण भागात आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण ठप्प झालेले आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक गर्दी करत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चौकट--------------
जिल्हा प्रशासनाने दीड लाख लसींची मागणी शासनाकडे केली आहे. यातील १३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. शहरातील दोन केंद्रांसह धर्माबाद येथील रुग्णालयात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे तर ग्रामीण भागात तुप्पा व अर्धापूर येथे लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी दिली.