हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयात डोळ्याच्या डॉक्टरचे पद आजपर्यंत भरलेच नाही. एक्स-रे मशीन अस्तित्वात असून, ते चालविण्यासाठी टेक्निशियनच नसल्याने एक्स-रे मशीन असून बिनकामाची झाली आहे. टेक्निशियन कर्मचारी पद भरण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असताना वरिष्ठ स्तरावर याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे रुग्णांना खाजगीत एक्स-रे काढून घेण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण रुग्णालयात ओपीडी रुग्णांची संख्या मोठी आहे. याव्यतिरिक्त येथे दोन नर्स, दोन वाॅर्डबाॅयची पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाची सेवा कोलमडली आहे.
सध्या वातावरणात बदल झाल्याने रुग्णांत वाढ झाली. डोळ्यांच्या डॉक्टरचे पद रिक्त असल्याने आणि डोळ्यासंदर्भात औषधी डोळ्यात टाकण्याचा कोणत्याच प्रकारचा ड्रॉप उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत आहे. यासंदर्भात औषधी विभागात विचारणा केली असता डोळ्यात टाकण्याच्या ड्रॉपची मागणी केली होती. त्यांचा पुरवठा करण्यात आला नसल्याचे सांगितले. वरील पदे लवकर भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.