नांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत १३ व्या दिवशी श्री संत गजानन महाराज सेवा. संस्था, नांदेडच्या वतीने श्रीनिवास भणगे लिखित सुरेश पुरी दिग्दर्शित ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. रसिकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या या नाटकाने एकेकाळी व्यावसायिक रंगभूमीवर असंख्य प्रयोग केले़ रसिकांनीही त्यास तितक्याच ताकदीने दादही दिली ; पण हेच नाटक जेव्हा नव्याने स्पर्धेत उतरते तेव्हा रसिकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि तितक्याच ताकदीने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.काकासाहेब धोट्यांच्या घरात त्यांचे पुतणे व्यंकटेश ऊर्फ अप्पासाहेब, पत्नी शांता आणि त्यांचं चालू कार्ट श्याम हे सुखाने (पण एकमेकांना नावे ठेवीत) राहत आहेत. श्याम आपली प्रेयसी दयाला दिलेलं वचन अंमलात आणत नाही. त्याचा नाईलाज होतो़ एके दिवशी माया साने ही या घरात येते व दया या नावाने राहू लागते़ शांताबार्इंच्या हाती पोस्टाद्वारे आलेलं माया सानेंचं एक पत्र पडतं.पत्र कसलं तर व्यंकटेश धोट्यांना आलेलं प्रेमपत्र. घरात गजब होणारंच. भरीस भर म्हणून पोलीस इन्स्पेक्टरांनी धोट्यांची चौकशी करण्यासाठी घातलेली धाड. 'मायाळू' शांताबाईंचे काय होणार? अप्पासाहेब 'निर्दोष' ठरणार? श्यामची 'भानगड' मिटणार? दया आणि मायांचे 'भवितव्य' काय? गुबुगुबू म्हणताच मान हलवणाºया काकासाहेबांचे 'दुखणे' कुठे जाणार? इन्स्पेक्टरांना 'दिगंबर' कोणी केले?या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत रसिकप्रेक्षक मात्र खळखळून हसतात.यातील काकासाहेब - डॉ. सुरेश पुरी, अप्पासाहेब - गणेश जैस्वाल, शांता - सुफला बारडकर, श्याम - पराग कुलकर्णी, दया - प्रतिभा बोजलवार, माया - पूजा वाघमारे, इन्स्पेक्टर - रमेश पतंगे. पोस्टमन- जुगल शुक्ल यांनी आपआपली भूमिका उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला. तर नेपथ्य- शरद नळगीरकर, प्रकाशयोजना -अविनाश रामगिरवार, संगीत- राजीव देशपांडे, रंगभूषा व वेशभूषा - आरती नळगीरकर आणि स्नेहा कुलकर्णी, रंगमंच व्यवस्था- गुलाबराव पावडे यांनी सांभाळली. १ डिसेंबर रोजी समर्थ निर्सग मंडळ, परभणीच्या वतीने रवींद्र कातनेश्वरकर लिखित, रवी पुराणिक दिग्दर्शित ‘अनभिज्ञ’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
शांतेच्या कार्ट्यामुळे सभागृहात हास्याचे कारंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:19 AM
श्रीनिवास भणगे लिखित सुरेश पुरी दिग्दर्शित ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले.
ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा नांदेडकर रसिकांनी दिली भरभरुन साथ