घरासमोरून चोरट्याने ऑटो लांबविला
किनवट शहरातील सुभाषनगर येथे घरासमोर उभा केलेला ऑटो चोरट्याने लांबविला. ही घटना १ एप्रिल रोजी घडली. शेख शौकत शेख मुस्तफा यांनी सुभाषनगर येथील घरासमोर ८० हजार रुपयांचा ऑटो उभा केला होता. हा ऑटो चोरट्याने लांबविला. याप्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या निधीवर डल्ला
नांदेड- शासनाकडून स्वच्छ भारत मिशन व इतर योजनांसाठी आलेल्या लाखो रुपयांच्या निधीवर डल्ला मारण्यात आला. हा प्रकार किनवट तालुक्यातील मौजे दिग्रस येथे घडला. या प्रकरणात किनवट पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
मौजे दिग्रस येथे शौचालये बांधकाम व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व चौदाव्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. हा निधी या कामासाठी खर्च न करता हडप करण्यात आला. या प्रकरणात प्रभाकर माधवराव आरमाळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारूची चोरटी विक्री करताना पकडले
माहूर येथे आरोपीने राहते घरी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी साठा केला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली. यावेळी दीड हजार रुपयांची दारू, मोबाइल असा एकूण साडेआठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सायखेड येथे पानटपरीत दारू विक्री
धर्माबाद तालुक्यातील सायखेड फाटा येथे पानटपरीतून दारूची विक्री करण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी पाच हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणात धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.