नांदेड- भारत हा बुद्धीजीविंचा देश आहे. ज्यांनी कुणी जनविरोधी काम केले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असून हा इतिहास आहे. त्यातही महाराष्ट्र हे तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची भूमी आहे. त्यामुळे देशातील परिवर्तनाचे नेतृत्व आता महाराष्ट्राकडे आले असून ही संधी दवडू नका असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केले आहे.
नांदेडात आयोजित २८८ विधानसभा मतदार संघातील प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराचे शुक्रवारी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केसीआर म्हणाले, आजही देशात वीज, पाणी मिळत नाही. शेतकर्यांना आपला हक्क मिळत नाही. त्यामुळे या देशात आजपर्यंत शेतकर्यांनी अनेक लढे दिले आहेत. परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे. तेलंगणा निर्मितीपूर्वी त्या राज्याची वाईट अवस्था होती. परंतु बीआरएस आल्यानंतर अवघ्या नऊ वर्षात तेलंगणाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि देशातही हे हाेवू शकते. परंतु त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. देशात सर्वाधिक काळ काँग्रेस आणि भाजपाने राज्य केले. परंतु शेतकर्यांचे प्रश्न सुटले नाहीत. निवडणुका आल्या की जाती-पातीचे राजकारण करुन सत्ता मिळविण्यात येते. त्यामुळे आता केवळ त्यांना सत्ता देवून भागणार नाही, तर सर्वसामान्य, शेतकर्यांना सभागृहात जावून बसावे लागेल. त्यासाठी बीआरएस हा एकमेव पर्याय आहे. गेल्या ७५ वर्षापासून जे देशात सुरु आहे ते बदलण्याची वेळ आली आहे. असेही केसीआर म्हणाले. यावेळी राज्यभरातील विधानसभा प्रमुख उपस्थित होते.
दर दिवशी पाच गावांना भेटीआगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहनही केसीआर यांनी केले.