नांदेड : डाव्या विचारसरणीचा जगावर मोठा प्रभाव होता़ मात्र व्यवहार्य पर्याय न देता आल्यामुळे त्यांची पिछेहाट झाल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा़डॉ़ प्रदीप आपटे यांनी व्यक्त केले़ जोपर्यंत समाजाचे नियमन करणारी व्यवस्था ही त्यातील अन्यायाकडे पुरेसे लक्ष न देता मूळ प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती दाखवित नाही, तोपर्यंत जगात डावा विचार प्रभावी राहील, असेही डॉ़आपटे यांनी स्पष्ट केले़
साहित्य संमेलन व्याख्यानमालेतर्फे आयोजित जगात डाव्या विचारांची पिछेहाट का? या विषयावर ते बोलत होते़ कोणतीही व्यवस्था चालत रहावी, यासाठी तिला एक प्रकारचे स्थैर्य लागते़ मात्र या स्थिरतेमुळे अनेकवेळा वैगुण्य निर्माण होतात आणि जनतेत असंतोष पसरतो़ या असंतोषाच्या कारणाचे निराकरण न झाल्यास लोक आमूलाग्र बदलाची मागणी करतात़ अशा बदलाची मागणी करणाऱ्यांना डाव्या विचारांचे मानले जाते़ मात्र हा विचार व्यवहार्य पर्याय देऊ शकला नसल्याचे मत डॉ़आपटे यांनी मांडले़ या चळवळीकडून केल्या जाणाऱ्या मागण्या अवास्तव असतात, अशी पुष्टीही जोडत डाव्या चळवळीमधील अभ्यासाची परंपरा संपली असल्याची टीका त्यांनी केली़
आमुलाग्र बदल करण्याचा आग्रह धरणाऱ्या विचारांमधील प्रमुख प्रवाह म्हणजे मार्क्सवाद होय़ जगभरातील डाव्या म्हणविणाऱ्यांनी मार्क्सच्या परिभाषेचा वापर केला़ मार्क्सने तत्कालीन बाजारपेठेवर आधारित समाज व्यवस्थेची उत्तम चिकित्सा केली़ मात्र क्रांतीद्वारे घडवून आणण्यात येणाऱ्या या आमुलाग्रह बदलाचे प्रारूप काय असेल, याची मांडणी मार्क्सकडून झाली नसल्याचे ते म्हणाले़ मार्क्सने जे क्रांतीनंतरच्या समाजाच्या चित्र रंगविले, तेही मनोराज्यवादीच आहे, अशी टीकाही आपटे यांनी केली़ मार्क्सवाद्यांनी बाजारपेठेची जागा केंद्रीयकृत नियोजन घेईल, अशी अपेक्षा केली होती़ परंतु बाजारपेठेमधून वस्तूंची देवाणघेवाण जितक्या कार्यक्षम पद्धतीने होते, तितकी ती केंद्रीयकृत नियोजन व्यवस्थेत होत नाही असे सांगत रशियन राज्यक्रांतीनंतर खुद्द लेनीन यांच्या लक्षात ही बाब आली होती़ म्हणूनच त्यांनी काही काळ सोवीयत रशियामध्ये बाजारपेठेच्या व्यवहारांना वाव दिल्याचे त्यांनी सांगितले़ स्वत:स साम्यवादी म्हणविणाऱ्या चीनने देखील मागील दोन दशकात बाजारपेठेवर आधारित व्यवस्था स्वीकारल्याचेही डॉ़आपटे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले़
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ़विश्वाधार देशमुख, तर डॉ़दत्ताहरी होनराव यांनी आभार मानले़ कार्यक्रमास माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, डॉ़प्रभाकर देव, प्रा़मधुकर राहेगावकर, शंतनू डोईफोडे, लक्ष्मण संगेवार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़