बारड : बारड शिवारात पुन्हा बिबट्या अवतरला असून, गोबरातांडा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याची बाब समोर आली आहे. गोबरातांडा परिसरातील मौजे नागेली येथील शेतकरी रमेश नानाराव गव्हाणे यांच्या बारड शिवारातील गट क्र. १२१ असलेल्या शेतातील आखाड्यावर बिबट्याने वगारूचा खात्मा केल्याची घटना घडली असल्याने बिबट्याचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच गव्हाणे यांच्या शेतावर वनपाल पांडुरंग धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळवून देण्याची हमी यावेळी देण्यात आली. गव्हाणे यांच्या शेतावरील ही दुसरी घटना असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याअगोदर या भागात बिबट्याने शिकार केल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या असल्याने बिबट्याचा वावर याठिकाणी असल्याने या भागातील शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्या हा गोबरातांडा, बारड, नागेली या शिवारातच वावरत असल्याने भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वन विभागाने याची दखल घेत बिबट्याला बंदिस्त करण्याची मागणी गोबरातांडा, बारड, नागेली येथील शेतकरी, ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.