कंधार (नांदेड ) : स्पर्धा परिक्षेची तयारी आहे पण कोरोनामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र, यामुळे हताश न होता वेळेचा आणि ज्ञानाचा सदुपयोग करत बारूळ ( ता.कंधार ) येथील पदवीधर अजय शिदरेड्डी या तरूणाने आधुनिक शेतीची कास धरली आहे. अजय जिरेनियम या सुगंधी औषधी वनस्पतीची शेती करत असून तालुक्यात या नव्या प्रयोगाबाबत उत्सुकता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक वर्षापासून शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. कडक निर्बंधांमुळे शिक्षण, उद्योग, व्यापार, दहावी-बारावी परीक्षांवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. वर्षभर तयारी करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेकांनी विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून उत्पन्नाचा नवा मार्ग निवडला आहे. असाच प्रयत्न बारूळ येथील पदवीधर अजय शिदरेड्डी याने केला आहे. त्याने जिरेनियम या सुगंधी औषधी वनस्पतीची १ हजार टयुसी कल्चर रोपे खरेदी केली. त्यासाठी आवश्यक पाणी निचरा होणाऱ्या चांगल्या जमिनीची निवड केली. एका एकर शेतीत ७ बेडवर जानेवारीमध्ये लागवड केली. त्यानंतर उगवण, पोषण व वाढीसाठी ठिबक सिंचनाची सोय केली. मानार नदी, कँनॉलमधील पाणी उपयोगी पडले. लागवडीनंतर साडेतीन ते ४ महिन्याला वनस्पतीची पहिली छाटणी व ३ महिन्याला पुढील छाटणी करावी लागते.
कंपन्या खरेदीसाठी येतातया प्रकारच्या लागवडीत २ प्रकारचे रोप असते. त्यात नॉर्मल रोप व टयुसी कल्चर रोपाचा समावेश आहे. छाटणी केलेला वनस्पतीचा पाला शिजवून तेल निर्मिती केली जाते. १ टन पाला शिलवला तर सुमारे १ किलो तेल निघते. एकरी वर्षभरात ४० टन पाल्यातून ४० किलो तेल हाती येते.१ किलो तेलाचे बाजार भाव १२ हजार ५०० असा आहे. मशागत , रोप, लागवड,संगोपन ,खताचा वापर ,बुरशीनाशक औषध आदी खर्च वगळता वर्षाला ३ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. या तेलाला मागणी जास्त असल्याने त्याला भाव चांगला मिळतो. सुगंधी औषधी, तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्या खरेदीसाठी येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यातीला मोठा वाव आहे .त्यामुळे बाजारपेठ फिरत बसायची आवश्यता भासत नाही. बारूळ ता.कंधार येथील टयुसी कल्चर रोप लागवडीचा जिल्ह्यात पहिला प्रयोग असल्याचे अजयने सांगितले. किफायतशीर व शाश्वत उत्पन्नाचा शेती प्रयोग करणाऱ्या या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावास्पर्धा परिक्षा देऊन अधिकारी होण्याचा मानस आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव व परिक्षा याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे जिरेनियम शेतीकडे वळलो. यातून ३ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. पुन्हा रोप तयार करून विक्रीसाठी ४ एकरवर लागवड करण्याचा मानस आहे. तरूणांनी आपल्या अवगत ज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करावा.त्यामुळे कुटुंब, समाज व देशाला फायदा होतो.- अजय शिदरेड्डी (बारूळ ता.कंधार.)