संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:13 IST2025-02-28T19:13:08+5:302025-02-28T19:13:50+5:30
सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार
- मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड) : मराठवाड्याची भूमी संघर्ष आणि शौर्याची भूमी आहे, आणि याच भूमीवर संतांची शिकवणही आहे. संघर्ष करून प्राप्त केलेली यशस्वी परंपरा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ व श्री देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
अजित पवार पुढे म्हणाले, "मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही, ते संघर्ष करून मिळवले आहे. त्याच इतिहासाला आजही आपण सन्मान देत आहोत. संत परंपरेचा विचार करत असताना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांनी प्रेम, समता, बंधुत्व यावर आधारित जीवनशैली दिली." तसेच, महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीवर बोलताना ते म्हणाले की, "इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन सर्वधर्म एकत्र राहतात. माणुसकी हाच धर्म आहे. जातीधर्माच्या सीमापार करत संतांनी मानवतेचा संदेश दिला. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात," असे ते म्हणाले.
श्रीक्षेत्र उमरज येथील धाकटे पंढरपूर श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या पवित्र भूमीवर आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थानाचे महंत श्री एकनाथ महाराज यांनी संस्थानाच्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच संस्थानला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली.