माहूर : 'आधी हाताला चटके मग मिळते भाकर' या बहिणाबाईं चौधरी यांच्या काव्य ओळी नागपूर येथील बेरोजगार रहेमतभाई व त्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष अनुभवाव्या लागत आहे.कोरोनामुळे आठ महिन्यापासून टीचभर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न या कुटुंबियासमोर उभा टाकला होता, परंतू आता प्रशासनाने मागील दोन महिन्यापूर्वी शिथिल नियमामुळे रोजी रोटीचा प्रश्न मिटून काही प्रमाणात आधार मिळाल्याचे रहेमत भाई यांनी सांगितले.
बिकट परिस्थितीने अल्पशिक्षित असलेल्या रहेमत भाई यांना ठराविश्व दारिद्र्य असलेल्या संसाराचा गाडा कसा हाकावा या विवंचनेत असलेल्या रहेमत भाई याच्या कुटुंबियासमोर सवाल उभा टाकला होता.मात्र कंठाच्या पहाडी व सुमधूर आवाजाने विविध गीत व प्रबोधनाची गीते गाऊन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या रहेमत भाई ने बेरोजगारीवर मात केली आहे. कुणाकडेही हात न पसरवता एकापेक्षा एक सरस देशभक्ती गीते , भीम गीते, भक्ती गीते, गाऊन प्रेक्षकांनी दिलेल्या दहा, वीस रुपयातून रोजगार त्यांनी मिळवला आहे. नागपूर शहरातील या बेरोजगार कुटुंबाच्या कलेचा अभिनव आदर्श बेरोजगारांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला. नशिबी गरीबी असलेल्या रहेमत भाई आणि त्यांचा संच व त्यांची पत्नी माहूर येथे असलेल्या आठवडी बाजारा दरम्यान असलेल्या बसस्थानक परिसरात त्यांनी भक्तिगीत आणि प्रबोधनाची सुमधुर गीते गाऊन प्रेक्षकांची मने जिंकून स्वाभिमानाने पैसे कमावले.
वडिलोपार्जित संगीताचे बाळकडू मिळवलेल्या रहेमत भाई यांनी त्यांच्या गायन कलेचा उत्कृष्ट नमुना आज माहूर शहरातील नागरिकांच्या मनाला मनमोहित करून टाकणारा ठरला. संगीताचा आनंद मिळत असल्याने बसस्थानक परिसरातील प्रवासी व आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांनी त्यांच्या सुमधुर आवाजाचा आस्वाद घेऊन स्वखुशीने दहा -वीस रुपये देऊन गेले. स्वाभिमानाचा सूर गवसलेले हे कुटुंब कुणाकडेही हात न पसरवता प्रेक्षकांना खुश केल्याशिवाय राहत नाही.हा त्यांचा विशेष गुण आहे. एकीकडे तरुण युवक नाउमेद होऊन आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे रहेमत भाई व त्यांचे कुटुंब आपल्या कलेच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करत बेरोजगाराना डोळस आणि धडधाकट्याना जगण्याची उमेद देणारा आदर्श तयार करत असल्याचे चित्र माहुरात अनेकांना याच देही याच डोळा अनुभवण्यास मिळाले आहे.