नांदेड : शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़ या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला़९ मार्च २०१७ रोजी जयभीमनगर भागात रात्री दहा वाजेच्या सुमारास आतिष ऊर्फ अक्षय गौतम वाघमारे (रा़ आंबेडकर नगर), अनिकेत ऊर्फ चिकू संदीप कांबळे व निहाल ऊर्फ शेट्टी विनायक पाईकराव हे तिघेजण मारोती जोंधळे या तरुणाला बेदम मारहाण करीत होते़ त्याचवेळी बुद्धभूषण कांबळे व अजय चित्ते हे दोघे जण भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते़ यावेळी आरोपी निहाल पाईकराव याने आमचे भांडण सोडविण्यास तू का मध्ये पडला असे म्हणून खंजीरने अजय चित्ते याच्यावर वार केला़ अजयने हा वार चुकविला़ त्यानंतर अनिकेत कांबळे याने अजयला पकडून ठेवले तर अक्षय वाघमारे व निहाल पाईकराव या दोघांनी अजयवर खंजीरने वार केले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी अजयचा मृत्यू झाला़ याप्रकरणी बुद्धभूषण कांबळे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात न्या़ एस़एसख़रात यांनी ११ साक्षीदार तपासल्यानंतर अक्षय वाघमारे, अनिकेत कांबळे व निहाल पाईकराव या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ यदूपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली़
खून प्रकरणात तिघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:41 AM