लोकमत न्यूज नेटवर्कमांजरम (ता. नायगाव) : ४० शेळ्यांना रानात चारा खावू घालून घराकडे परतत असताना जोरदार पावसाने वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचिवण्याची अफलातून कामगिरी शिवराज भंडारवार याने २० आॅगस्ट रोजी सायंकाळी केली. या कामगिरीबद्दल शिवराजचा जिल्हा परिषद शाळेत सत्कारही करण्यात आला.२० आॅगस्ट रोजी मांजरम परिसरातील नदी, नाले तुफान पावसाने भरले होते. पुलावरुनही पाणी वाहू लागले. याच दरम्यान शिवराज रामचंद्र भंडारवार हा त्याच्या ४० शेळ्यांना चारा खावू घालून घरी परतत होता. त्याच्या सोबतचा दुसरा व्यंकट लक्ष्मण इभूते व बैल घेवून आलेला नामदेव वंजारे हाही नदीजवळ पोहोचला. नामदेव यांचा बैल पाण्यातून मार्ग काढीत असताना त्याच्या पाठीमागे जाण्याच्या प्रयत्नात नामदेवचा पाय घसरुन पाण्यात पडला. तो वाहून जाणार असे दिसताच शिवराजने नदीच्या कडेपर्यंत त्याला पोहोचविले तर व्यंकट विभूते याचा झोक जावून पाण्यात पडून बुडत असताना क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेवून शिवराजने त्याला पाण्याबाहेर काढले. या दरम्यान सोबतच्या ४० शेळ्याही पाण्यात जाणार नाहीत, याची काळजी शिवराजला घ्यावी लागली, मात्र त्यातील एक शेळी पाण्यात वाहून गेली, मात्र दोघांचे प्राण वाचिवण्यात बहाद्दर शिवराजला यश आले.शिवराजच्या अतुलनीय कामगिरीची दखलशिवराज हा मांजरमच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून, तो दहावीला शिकत आहे. घटनेच्या दिवशी त्याचे आजोबा गावाला गेले होते. शाळेतील शिक्षक काळे यांना विचारुन त्याने आजोबांच्या शेळ्यांना घेवून शेताकडे तो गेला होता. दरम्यान, शिवराजच्या अतुलनीय कामगिरीची गावात चर्चा झाली. या कामगिरीबद्दल जि.प.शाळेत त्याचा २३ आॅगस्ट रोजी सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक भूजंग सोनकांबळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासह मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मांजरमच्या धाडसी विद्यार्थ्याने वाचविले वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:58 AM