लोहा : लोहा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले ऊर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरण 97.25 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पुढील काळात पाऊस झाल्यास धरणातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने ऊर्ध्व मानार पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जी. कुरेकर यांनी गुरुवारी (दि. 17) धरण क्षेत्राखालील नदी काठच्या लोहा व कंधार तालुक्यातील 13 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणात आजघडीला 97.25 टक्के जलसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रातुन पाण्याचा येवा सुरूच आहे. यापुढे पाऊस होत राहिल्यास धरणातील पाणी पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागू शकतात. यामुळे नदी काठावर घर, शेती असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा उर्ध्व मानार पाटबंधारे उपविभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील लिंबोटी, डोंगरगाव, चोंडी व दगडसांगवी तर कंधार तालुक्यातील उमरज, बोरी (खु), संगमवाडी, घोडज, बाळांतवाडी, शेकपूर, हणमंतवाडी, कोल्ह्याचीवाडी व इमामवाडी आदी 13 गावे मानार नदी काठालगत आहेत. या गावांतील सरपंचांना तसेच लोहा व कंधारच्या तहसीलदारांना याची माहिती देण्यात आली आहे. सध्या धरणाची 447.42 मीटर पाणी पातळी आहे, तर 73.62 दलघमी पाणी साठा असल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जी. कुरेकर यांनी दिली आहे.