शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. एकाच दिवशी एखाद्या गावात एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येणारे लिंगापूर हे जिल्ह्यातील पहिलेच गाव असावे. परिणामी, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिंगापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दोन दिवस गावकऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली. जवळपास १४७ जणांपैकी ३१ जण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन महिलांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना आखल्या जात आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. काही लक्षणे असतील तर लगेचच तपासणी करून घ्यावी. घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भागवत देवसरकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष परसराम पाटील देवसरकर, सुनील देवसरकर, संतोष देवसरकर, जयंतराव देवसरकर, अविनाश देवसरकर, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई कवडे, परसराम कवडे, संदीप कवडे, सुभाष कवडे यांनी केले आहे.
प्रशासनाने याेग्य उपाययोजना कराव्यात
रुग्णांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवावे व गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी तालुका प्रशासनाकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
संपूर्ण गावाची होणार तपासणी
आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हा आकडा आला आहे. प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या असून गरजेनुसार रुग्णाने कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती केले जात आहे. गाव सॅनिटायझिंग करण्यात आले असून लवकरच गावातील सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. - जीवराज डापकर, तहसीलदार, हदगाव
धार्मिक कार्यक्रमास जबाबदार कोण?
लिंगापूरमध्ये एकाच दिवशी २९ रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी गावात एक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिक आणि पाहुण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमांवर निर्बंध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास कोण जबाबदार, ग्रामपंचायतीने अथवा सरपंच, ग्रामसेवकांनी या कार्यक्रमास का विरोध केला नाही, अथवा प्रशासनास कळविले नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.