- विशाल सोनटक्के
नांदेड : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या तब्बल १० ने कमी झाली आहे़ त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षांना दिलासा मिळाला आहे़ मात्र वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उडी घेतल्याने काँग्रेस-भाजपच्या लढाईत वंचित आघाडीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़
नांदेड लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे़ १९७७ मध्ये केशव धोंडगे (शेकाप), १९८९ व्यंकटेश काब्दे (जनता दल) आणि २००४ मध्ये डी़पी़ पाटील (भाजपा) यांनी विजय मिळविला़ या तीन निवडणुका सोडल्या तर १५ पैकी तब्बल १२ निवडणुकांत गुलाल उधळण्याची संधी काँग्रेसच्याच वाट्याला आलेली आहे़ यंदा काँग्रेसकडून विद्यमान खा़अशोक चव्हाण रिंगणात आहेत़ त्यांची लढत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे कुठपर्यंत मजल मारतात यावर निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे़
मागील निवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात होते. यंदा १४ उमेदवार रिंगणात आहेत़ यात काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रीय पक्षाचे दोन, तर नोंदणीकृत राजकीय पक्षाचे पाच उमेदवार रिंगणात असून त्यांच्यासोबत सात अपक्ष नशिब आजमावत आहेत़ यात भाजपाचे बंडखोर महेश तळेगावकर यांचाही समावेश आहे़
2014 मध्ये १३ अपक्ष उमेदवार रिंगणात होते़ मात्र त्यातील अवघ्या तीन उमेदवारांना ५ हजारांवर अधिक मते मिळविता आली़ या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या ७ अपक्षांना मतदार कितपत प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
24 उमेदवार होते रिंगणात२००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२, तर २०१४ मध्ये २४ उमेदवारांनी आपले भवितव्य अजमावले होते़ त्या तुलनेत यंदा केवळ १४ उमेदवार रिंगणात असल्याने प्रमुख उमेदवारांसमोरची मत विभाजनाची चिंता काहीशी कमी झाली आहे़
13,155 मते नोटाला काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष वगळता उर्वरित २२ उमेदवारांनी १ लाख ८ हजार ६०१ इतकी मते खेचली होती़ यात ३ हजार १५५ मते नोटाला गेली होती़
81,455 मतांनी पराभव२०१४ मध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण ४ लाख ९३ हजार ७५ मते घेवून विजयी झाले होते़ प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार डी़बी़ पाटील यांचा ८१ हजार ४५५ मतांनी पराभव केला होता़ डी़बी़ पाटील यांना ४ लाख ६२० मते मिळाली होती़
40,963 मते १३ अपक्षांनाबसपाचे डॉ़हंसराज वैद्य यांना २२ हजार ८०९ तर बीएमयुपी पक्षाच्या राजरत्न आंबेडकर यांना २८ हजार ४४७ मतांवर समाधान मानावे लागले होते़ आठ नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना एकूण ६४ हजार ४८३ इतकी मते मिळाली होती़ तर १३ अपक्ष उमेदवारांनी ४० हजार ९६३ मते मिळविली होती़