Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत !; गुरू-शिष्याच्या डावपेचाकडे साऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:17 PM2019-03-26T14:17:33+5:302019-03-26T14:26:30+5:30
अशोक चव्हाण यांचा प्रताप पाटील चिखलीकरांशी सामना
- विशाल सोनटक्के
नांदेड : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेते खा.अशोक चव्हाण आणि भाजपाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवित भाजपाला धूळ चारली होती. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली त्या चिखलीकरांवरच भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपातील ही लढाई चुरशीची होणार असून यात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नांदेड लोकसभेच्या मैदानात काँग्रेसकडून पुन्हा अशोक चव्हाण उतरले आहेत. भाजपने लोहा-कंधारचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यामुळेही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता या मतदारसंघाने ३ लोकसभा निवडणुका वगळता सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना अशोक चव्हाण यांनी भाजपच्या डी. बी. पाटील यांचा तब्बल ८२ हजारांहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला होता. त्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. त्यातही काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादीच्या मदतीने आपला झेंडा फडकाविला. त्यानंतर झालेली महानगरपालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती.
मनपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षासह भाजपाच्या निम्म्या मंत्र्यांनी नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र त्यानंतरही ७३ जागा जिंकत काँग्रेस अभेद्य राहिली. भाजपला ६ तर शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपा आमने सामने ठाकले आहेत.
भाजपकडून चार ते पाच जणांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा होती. मात्र ऐनवेळी पक्षाने अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरविले आहे. चिखलीकर यांना उमेदवारी देवून चव्हाण यांना नांदेडमध्येच गुंतवणूक ठेवण्याचा या मागे भाजपचा डाव असल्याचे बोलले जात आहे. चिखलीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जितील आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे चिखलीकरांच्या मागे भाजप तगडी यंत्रणा उभी करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही अशोक चव्हाण यांना रिंगणात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. डॉ. यशपाल भिंगे मैदानात उतरले आहेत. या आघाडीला मानणाराही मोठा वर्ग मतदारसंघात असल्याने भिंगे यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नाराजांना थोपविण्याचे आव्हान
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजपा युती आणि वंचित बहुजन आघाडी असा सामना होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची मने जुळविण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीतील संघर्ष चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शमलेला नाही. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या चिखलीकर यांनी दीड वर्षानंतर भाजपासोबत घरोबा केला. याचे शल्य जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात अद्यापही आहे. त्यातच अवघ्या दीड वर्षांत भाजपामध्ये येऊन उमेदवारी पटकाविल्याने भाजपातील निष्ठावंतही दुखावलेले आहेत.
गुरू-शिष्याच्या डावपेचाकडे लक्ष
चव्हाण आणि चिखलीकर आमने-सामने आल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतात. मागील महिन्यात अशाच एका कार्यक्रमात हे कट्टर विरोधक एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोघांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी माझ्या विरोधात असलेले अनेक जण हे माझे जुने चेले असल्याचे चिखलीकरांचे नाव न घेता सांगत गुरु आपल्या चेल्याला सगळे डाव शिकवतो मात्र त्यानंतरही त्याच्याकडे एकतरी हातचा पक्का शिल्लक असतो अशा शब्दात सुनावले होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या गुरु-शिष्यातील लढाई पुन्हा रंगणार आहे.
२०१४ चा निवडणूक निकाल :
अशोक चव्हाण (काँग्रेस) : ४९३०७५
डी. बी. पाटील (भाजप) : ४११६२०
विधानसभा पक्ष मताधिक्य
भोकर काँग्रेस २३,१९९
उत्तर नांदेड काँग्रेस ४३,१५४
दक्षिण नांदेड काँग्रेस २७,०९६
नायगाव भाजप ३,८४६
देगलूर काँग्रेस २,३३७
मुखेड भाजप ११,१०२
काँग्रेसला मिळालेले मताधिक्य ८१४५५