- विशाल सोनटक्के
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी सामना रंगला आहे़ प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रमुख पक्षांकडून जंगी सभांवर भर दिला जात आहे़ मात्र या सभांमध्ये विकासकामांचा मुद्दा भाजपासाठी अडचणीचा ठरत आहे़ युती शासनाच्या मागील साडेचार वर्षाच्या कालावधीत नांदेडला काय दिले? या प्रश्नावर युतीच्या नेत्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे़
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नांदेड लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे़ दुसरीकडे भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे रिंगणात आहेत़ चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये नुकतीच प्रचारसभा घेतली़ या सभेला गर्दी जमविण्यात भाजपला यश आले असले तरी विकासकामांऐवजी आरोप-प्रत्यारोपावरच मोदींनी भर दिल्याचे दिसून आले़ दुसरीकडे काँग्रेस मात्र मागील कार्यकाळात नांदेडमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच मतदारांसमोर मांडत आहे़ सध्या राज्यातील अनेक भाग पाणीटंचाईमुळे होरपळून निघालेले असताना नांदेडकरांना मात्र टंचाईची तीव्रता जाणवत नाही़ दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी साकारलेल्या विष्णूपुरी, उर्ध्व पैनगंगा तसेच सिद्धेश्वर आणि येलदरी प्रकल्पामुळेच हे शक्य झाल्याचे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे़
नांदेडला स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची शक्यता असतानाही शंकररावांनी आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र तर अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये आलेले रेल्वेचे विभागीय कार्यालय, विमानतळाचा विस्तार, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत केलेली २,२०० कोटींची कामे तसेच गुरू-ता-गद्दीच्या माध्यमातून शहरात ७५० कोटी खर्चून केलेली विकासकामे काँग्रेस कार्यकर्ते मतदारांत घेऊन जात आहेत़ राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाव्यतिरिक्त सांगण्यासारखा एकही मोठा प्रकल्प नसल्याने युतीचे नेते विकासकामाचा हा मुद्दा टाळताना दिसून येतात़ त्यामुळेच मोदींंनीही जाहीर सभेत विकासकामांऐवजी काँग्रेसवर एकतर्फी टीका करणेच पसंत केले़ आता तीनही उमेदवार आक्रमक प्रचारावर भर देतील.
प्रमुख उमेदवारअशोक चव्हाण । काँग्रेसप्रताप पाटील । भाजपयशपाल भिंगे । वंचित आघाडी
कळीचे मुद्देनांदेडसाठी स्वतंत्र आयुक्तालय देण्याची आग्रही मागणी आहे़ यावर सेना-भाजप नेते काय बोलतात, याची उत्सुकता आहे़ भाजप सरकार नांदेडकरांचे पाणी पळवीत असल्याचा आरोप होतो आहे़ याबाबतही भाजपला स्पष्टीकरण द्यावे लागेल़
जनता मतदानातून उत्तर देईल जातीपातीचे राजकारण काही काळ चालते़; परंतु सर्वांनाच विकास हवा असतो़ त्यामुळे आम्ही विकासाचे राजकारण करतो़ यूपीपी धरण काँग्रेसने आणले़; परंतु भाजपा सरकार या धरणातील पाणी वरच्या भागात वळती करण्याचा प्रयत्न करीत आहे़ या प्रकाराला येथील जनता मतदानातून उत्तर देईल़ - अशोक चव्हाण, काँग्रेस
विकासासाठी संधी द्या विकासकामे करण्यासाठी संधी देण्याची विनंती आम्ही मतदारांकडे करीत आहोत़ नांदेडच्या विकासासाठी मी स्वत: पाच कोटींचा निधी आणला़ मी केवळ विकासाच्या गप्पा आणि भावनिक मुद्यावर भर देत नाही़ सध्या महामार्गाची हजारो कोटींची कामे जिल्ह्यात सुरू आहेत़ - प्रताप पाटील, भाजप