नांदेड : कंधार तालुक्यातील पानभोसी येथील बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर १०० रुपयांत उत्तराची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली. विशेष म्हणजे हजार रुपयांत थेट परीक्षार्थींपर्यंत उत्तर पोहोचविण्याची जबाबदारी काहीजण घेत होते.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून बारावी परीक्षेस प्रारंभ झाला. पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी हिंदी विषयाची परीक्षा होती. दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान काही तरुण चित्रपटाचे तिकीट ब्लॅक करतात त्याप्रमाणे प्रश्नासह त्याचे उत्तर १०० रुपयाला देतो, असे सांगत होते. हेच तरुण सदर प्रश्नाचे उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी हजार रुपये लागतील, असे सांगत होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने दुपारी साडेबारा वाजता कृती ३ (अ) हा परिच्छेद वाचून सूचनेनुसार कृती पूर्ण करण्याचा ६ गुणांचा प्रश्न आणि त्याचे उत्तर सदर तरुणाकडून १०० रुपयाला घेतले. असाच प्रश्न, उत्तरविक्रीचा प्रकार या केंद्र परिसरात इतर काही तरुणांकडूनही सुरू होता.
केंद्र परिसरात मोबाईलवर निर्बंध असतानाही काही जणांकडून याचा सर्रास वापर केला जात होता. पानभोसी येथील परीक्षा केंद्रानंतर ‘लोकमत’चा चमू कंधार तालुक्यातीलच श्री शिवाजी विद्यालय, बारुळ येथील परीक्षा केंद्रावर गेला. तेथेही परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्यासाठी तरूण उभे होते. त्यातील काही तरुण परीक्षा केंद्राच्या खिडकीत जावून आतमध्ये चिठ्ठ्या टाकत होते. विशेष म्हणजे, या दोन्ही परीक्षा केंद्रांवर पोलिसांसमोर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी माहूर येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. माहूर तालुक्यातील काही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्यानंतर मी बैठकीस उपस्थित होतो. सायंकाळी साडेपाचपर्यंत बैठक चालली. त्यामुळे कंधार तालुक्यातील परीक्षा केंद्रावर काय प्रकार झाला, याची माहिती नाही. मात्र प्रकरणाची चौकशी करणार असून शनिवारी संबंधित परीक्षा केंद्रावर भरारी पथक पाठविण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी लोकमतला सांगितले.