लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन दिवसांपासून माहूर तालुक्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे तालुक्यातील अपवाद वगळता १०० टक्के शेतातील पिके वाहून गेली. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. काल दिवसभरात झालेल्या १८८ मिलि पावसाने नदी- नाले, काठावरील गावे, वाडी, तांडे, जलमय झाले होते. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील वाहतूक ही पैनगंगा नदीचा पूर ओरसल्याने हळूहळू पूर्वपदावर येत आहे.माहूर तालुक्यात १६ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. माहूर १९० (७००) मि़मी़, वाई बाजार २३२ (७५६) मिमी, वानोला १६३ (६००) मिमी, सिंदखेड १६७ (७२९) मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १८८ मिमी एवढी आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यात नागरिकांची शेती, घरे क्षतिग्रस्त झाली. कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कोट्यवधी रुपयांचा पिकांचा तर घरातील संसारोपयोगी साहित्य आणि घराची पडझड यात लाखोंचे नुकसान झाले आहे.माहूर शहरातील सखल भागातील शेकडो घरांत पाणी शिरल्याने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विद्या कदम, उपनगर अध्यक्ष राजकुमार भोपी, नगरसेवक इलियास बावानी, वनिता जोगदंड, रफिक सौदागर, अजीज भाई, शीतल जाधव, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी आणि न.पं.ची टीम पडझड झालेल्या प्रत्येक घराची पाहणी केली. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या वतीने तालुकाभर सर्व्हे सुरू झाला आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाची तीन दिवसांत व इतर नुकसानीची संपूर्ण मदत तातडीने देण्यात येईल, अशी माहिती आ. प्रदीप नाईक यांनी दिली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव, उपविभागीय महसूल अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत आदी उपस्थित होते.@गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून धनोडा येथील पैनगंगा पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुलावरील पाण्याची पातळी रात्री २ च्या सुमारास कमी झाली व पुलावरून वाहतूक पहाटे ६ वाजेपासून हळूहळू सुरू झाली. पुरामुळे पुलावरील सर्व कठडे तुटले असून काही रेलिंग वाहून गेले आहे.महागाव सा.बां. उपविभाग यांना सूचित करण्यात आले व त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती साबां विभागाचे अभियंता रवींद्र उमाडे, आकाश राठोड यांनी दिली.अतिवृष्टीग्रस्त वानोळा परिसराची पाहणी१६ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व नाल्याच्या पुरामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्याची प्रत्यक्ष पाहणी आ.प्रदीप नाईक यांनी करुन दूरध्वनीसंदेश व तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या आदेशानुसार माहूर तालुक्यातील वानोळासह परिसरातील पाचोंदा, पानोळा, मेंडकी , मुंगशी, रामपूर गावांतील शेतशिवाराची पाहणी तलाठी डी. व्ही.पेंटेवाड , सागर हिवाळे यांनी केली. यावेळी माजी जि.प.सदस्य दत्तराम राठोड, सरपंच डॉ.रविकुमार मेंडके , उपसरपंच सुरेश राठोड, माजी उपसरपंच अभिजित राठोड , अनिल तोडसाम, किशोर पवार, आनंदराव कुडमेते, पंडित धुप्पे, रविकुमार आडे,पत्रकार अॅड.नितेश बनसोडे उपस्थित होते .
माहूर तालुक्यातील पिके गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:12 AM