नांदेड : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे. परंतु, कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.
यंदा रत्नागिरीचा हापूस आंबा ६०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत निम्म्याच दराला विक्री करण्यात येत आहे. केशर ११० रुपये, पायरी ८०, तर गावरान आंबे हे ७० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता. परंतु, यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्यांचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. नांदेड शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.
आवक वाढली, ग्राहक रोडावले
दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नागिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबा घेऊन आले आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केला जात आहे. परंतु, ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. दररोज सकाळी गाडा लावल्यानंतर सायंकाळपर्यंत मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.