कंधार ( नांदेड) : राष्ट्रवादी हा महायुतीतीलच घटक पक्ष असल्यामुळे लोहा मतदारसंघातील आमदार चिखलीकर यांचे भाजपातील समर्थक कार्यकर्त्यांची अवस्था म्हणजे हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ' अशी झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर काही महिन्यांपुरतेच एकत्र आले होते. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत लोहा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. विधानसभा निवडणुकीत विजय झाला.
लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आमदार चिखलीकरांनी जेव्हा जेव्हा पक्ष बदलला तेव्हा त्यांनीही पक्ष बदलला होता. पण, यावेळेस मात्र उलटेच घडले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधीलच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चिखलीकरांना तिकीट मिळाले आणि निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी हा महायुतीमधील घटक पक्ष असल्यामुळे कार्यकर्ते मात्र भाजपामध्येच राहिले. परंतु आता भाजपाची धुरा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यात व लोहा मतदारसंघात काँग्रेससह इतर पक्षांना उतरती कळा लागली आहे. असे असताना महायुतीत असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांत मात्र पक्ष विस्ताराची स्पर्धा लागल्याची रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे चिखलीकरांना शह देण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनीही लोहा मतदारसंघातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. त्यामुळे या मतदारसंघातील आमदार चिखलीकर यांचे भाजपातील कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.
स्वबळावर लढण्याचा नारामतदारसंघात महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. खासदार अशोक चव्हाण व आमदार चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत. त्यामुळे भाजपामध्ये व राष्ट्रवादीमध्ये नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत.